राजुरा : वादळी वाऱ्यामुळे घरगुती वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना सध्या वारंवार घडत आहेत. यामुळे वीज वहिनीच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांच्या फांद्या महावितरणकडून तोडण्यात येत आहेत. वीजपुरवठा खंडित होणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उच्चशिक्षित कुटुंबियांकडून शिवीगाळ व जीवे मरण्याची धमकी देण्यात आली.
सामाजिक जाणीव जपणारे व सुशिक्षित अशी ख्याती असणाऱ्या या कुटुंबाकडून सहकार्य करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न घडता याउलट शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या कुटुंबियांविरोधात राजुरा पोलीस स्थानकात महावितरणच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे.
राजुरा येथील बामनवाडा परिसरातील तक्षशिला नगर येथील लघुदाब विद्युत वाहिनीवर काही झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार कार्यरत लाईनमन राहुल वासेकर यांच्या लक्षात आला. याची माहिती त्यांनी सहाय्यक अभियंता यांना दिली. ट्री कटिंग कामादरम्यान विद्युत वहिनीला लागणारी झाडे कापण्याचे काम सुरू झाले. परंतु, तक्षशिला नगर येथील नील कांबळे व प्रसंजित कांबळे यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ विलास बानकर, लाईनमन राहुल वासेकर व सहाय्यक अभियंता ठमके यांच्यासोबत अरेरावी व हुज्जत घालत भांडण्यास सुरुवात केली. या दरम्यान अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत झाडे कापण्यास विरोध केला. शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात केली आहे.