लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम प्रारंभ केली आहे. गत काही दिवसांपासून महानगरपालिकेची सुरू केलेली ही कारवाई कायम सुरू राहणार असून प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पानठेल्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे सुरू केले आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिंगल यूज प्लास्टिक वापरास पूर्णपणे बंदी आहे, तरीही काही दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करताना दिसून येत असल्याने त्यांच्या विरोधात जप्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. मनपातर्फे सिंगल यूज प्लास्टीकबाबत पानठेलाचालकांना माहिती देण्यात येत आहे, शिवाय प्लास्टीक पन्नीचा वापर न करण्यासंबंधी त्यांच्याद्वारे स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे. मात्र यानंतरही जर प्लास्टीक पन्नी आढळून आली तर दंडात्मक कारवाई करून स्थायी स्वरूपाच्या पानटपरी बंद करण्यात येतील व अस्थायी स्वरूपाच्या पानटपरी अतिक्रमण विभागाद्वारे उचलून मनपा कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व पानटपरी चालकांना 'येथे प्लास्टीक पन्नी मिळत नाही ' अशाप्रकारचा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. वस्तुत: पन्नीसाठी बटर पेपरचा पर्याय पानठेलाचालकांकडे उपलब्ध आहे. मात्र याचा वापर फार कमी प्रमाणात करण्यात येत असल्याने महानगरपालिकेच्या तीनही झोनमध्ये कारवाई करण्यात येत आहे.नागरिकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभागी होऊन कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, दुकानदारांवर अवलंबून न राहता घरातून कापडी पिशवी नेऊन सामान खरेदी करावे, दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रपूर मनपाने केले आहे.
मनपाची प्लास्टिक पन्नी जप्तीची मोहीम तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 6:00 AM