समाजापुढे आदर्श : अनाथांना केली ४५ हजारांची मदतरत्नाकर चटप नांदाफाटासकाळी ९.३० ची वेळ... मंडप पाहुण्यांच्या गर्दीने गजबजलेला होता. एकामागून एक पाहुणे घाईगडबडीने मंडपात येत होते. काही वेळातच वधूचे लग्नमंचावर आगमन झाले आणि ९.४५ वाजता ‘आली लग्न घटी’ म्हणून मंगलाष्टकांना सुरुवात झाली. त्याच्या निमंत्रण पत्रिकेवरची वेळही ९.४५ होती. अगदी वेळेवर लग्न लागले. यानंतर या विवाह सोहळ्यात पार पडलेल्या एका छोट्या कार्यक्रमाने मात्र उपस्थितांचे मन गहिवरून आले. राजुरा शहरातील दोन अनाथ बांधवांना या सोहळ्यात वधू व वर पक्षाकडून ४५ हजारांची मदत देण्यात आली आणि साऱ्या मंडपात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.गडचांदूर येथील रामकृष्ण मार्खंडी पाचभाई यांचे चिरंजीव चेतन व चार्ली येथील मंगेश बालाजी मोरे यांची कन्या पल्लवी हिचा विवाह सोहळा मंगळवारी सकाळी राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात पार पडला. लग्नसोहळ्यावर अधिक खर्च न करता तो खर्च गरिबांच्या शिक्षणासाठी उपयोगी यावा, हा विचार अगोदरच चेतनने आपल्या कुटुंबीयांना सांगितला होता. राजुरा येथील ग्रामीण बँकेत चेतन नोकरीला आहे. शैक्षणिक जीवनापासून त्याला सामाजिक कार्याची आवड आहे. हाच विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न त्याने केला. वधुपक्षालाही त्याचा विचार पटला आणि राजुरा येथील स्वामी विवेकानंद वसतीगृहातील अनाथ रामचंद्र विठ्ठल विधाते (१५) आणि शारदा विठ्ठल विधाते (१३) या अनाथ भावंडाना त्यांच्या शिक्षणासाठी नागोबा पाचभाई, रामकृष्ण पाचभाई व मंगेश मोरे यांच्याकडून ४५ हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. यावेळी माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, जि.प. सदस्य अविनाश जाधव, सतीश धोटे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे आदी उपस्थित होते. पाचभाई आणि मोरे परिवाराच्या या दातृत्वाने लग्नसमारंभाला सामाजिक कार्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
लग्न समारंभात रंगला दातृत्वाचा अनोखा सोहळा
By admin | Published: June 01, 2016 1:19 AM