बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : सर्वाधिक मतदारांचा प्रभागबल्लारपूर: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हजार व पाचशे रुपयाची नोट चलनातून बाद केल्याच्या सावटात बल्लारपूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. २७ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथील प्रभाग पाच-‘अ’मध्ये ओबीसी महिला रखीव जागेवर परंपरागत दोन महिला लढतीत आहेत. ‘ब’ मधील सर्वसाधारण जागेवर विद्यमान नगरसेवक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह नगरसेवकपदाची निवडणूक लढवित आहेत. शहरातील सर्वाधिक मतदारांचा हा प्रभाग असून प्रभाग पाचमध्ये लक्ष वेधणारी निवडणूक ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.येथील प्रभाग पाच मध्ये एकूण ७ हजार २५६ मतदार असून त्यात ३ हजार ८४९ पुरुष व ३ हजार ४०७ महिला मतदारांचा समावेश आहे. शहरातील एकूण १६ प्रभागापैकी हा प्रभाग मतदारांच्या संख्येने सर्वाधिक मोठा आहे. प्रभाग पाच मधील ‘अ’ ओबीसी महिला राखीव गटात भाजपाच्या उमेदवार व विद्यमान नगरसेवक मीना चौधरी व काँग्रेसच्या उमेदवार तथा माजी नगरसेवक शोभादेवी महतो यांच्यात परंपरागत लढत होत आहे. ‘ब’ सर्वसाधारण जागेसाठी शिवसेनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवक विनोद उर्फ सिक्की यादव यांना काँग्रेसचे प्रवीण गडलमवार, भाजपाचे बिहारीलाल प्रसाद, अपक्ष नंदा सनलामा व भगतसिंग दर्शनसिंह झगडा यांचेशी लढत द्यावी लागत आहे.या प्रभागातील पाच ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर दोन महिला तर ‘ब’ सर्वसाधारण जागेवर पाच उमेदवार एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रभागात गोकुलनगर वॉर्डातील मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने येथील मतदानावर जयपराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. मागील निवडणुकीत एका प्रभागातून चार उमेदवार निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी या प्रभागातून शिवसेनाचे विनोद उर्फ सिक्की यादव, उमाबाई कटारे, भाजपाच्या मीना चौधरी व अपक्ष डॉ. सुनील कुल्दीवार यांनी प्रतिस्पर्धा उमेदवारावर मात करुन विजय मिळविला होता. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला राखीव जागेवर भाजपाच्या मीना चौधरी यांनी काँग्रेसच्या शोभादेवी महतो यांचा पराभव करुन निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत याच पुन्हा एकमेकींना टक्कर देत आहेत.येथील नगरपरिषदेची होऊ घातलेली २७ नोव्हेंबरची सार्वत्रिक निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. येथील पालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त असल्याने नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा २ लाख ५० हजार रुपये इतकी निर्धारित केली आहे. त्याच प्रमाणे अध्यक्षपदाच्या उमेदवारांना ७ लाख ५० हजार रुपये मर्यादेत खर्च करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. अशातच केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केली आहे.जुन्या चलनी नोटा बँकेत जमा करण्याचे व व्यवहार बंदीचा निर्णय निवडणुकीतील उमेदवारांवर संकट ओढावणारा आहे. यामुळे उमेदवाराच्या प्रचारावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
दिग्गज उमेदवारांची लक्षवेधक लढत
By admin | Published: November 16, 2016 1:44 AM