लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे, असे सांगितले जात आहे. काही विकासात्मक गोष्टी होत असल्या तरी चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची दैना कमी झालेली नाही. पावसाळ्यातील जुलै महिन्यातच अनेक प्रभागातील रस्ते उखडले असून अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या महानगरातही वाहनचालकांना व पादचाऱ्यांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराचे विस्तारीकरणही होत आहे. नवीन वस्त्या निर्माण केल्या जात आहे. मात्र चंद्रपूर शहराचे विस्तारीकरण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शहर दाटीवाटीने वसले आहे. चंद्रपूरचे आठ-नऊ प्रमुख मार्ग आहेत. यात महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या मार्गांचा समावेश आहे. या प्रमुख मार्गांसह प्रभागात अनेक अंतर्गत रस्ते आहेत. चंद्रपूर मनपाला विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी येत असला तरी या मार्गांची दैना कमी झालेली नाही. जुलै महिन्यात बºयापैकी पाऊस पडत आहे. मात्र या पावसामुळे चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांचे बेहाल झाले आहे. रामनगर मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, बाबुपेठ मार्ग हे शहरातील प्रमुख मार्ग असतानाही या मार्गावर खड्ड्यांची श्रुंखला दिसून येते. प्रमुख मार्गाचेच हे हाल आहेत तर अंतर्गत रस्त्याची अवस्था कशी असेल, हे कळते. प्रस्तुत प्रतिनिधीने सोमवारी चंद्रपुरातील प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यावरून फेरफटका मारला असता गावखेड्यासारखे रस्ते या महानगरात दिसून आले. नगिनाबाग, रामनगर, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वरोरा नाका, तुकूम, दे.गो. तुकूम, बाबुपेठ परिसर या भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले असल्याने रस्त्यांचे सौंदर्यच नष्ट झाले आहे. काही भागात तर डांबरी रस्तेही नाही. त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना व पादचाºयांना चालणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळेत पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.नाल्यांचीही अवस्था दयनीयमहानगर म्हटले की त्यातील रस्ते गुळगुळीत व नाल्या स्वच्छ व रुंद असाव्या, असे अपेक्षित आहे. मात्र चंद्रपुरात रस्त्यांसोबत नाल्यांची अवस्था बिकट आहे. दुर्गापूर मार्गावरील बियाणी पेट्रोल पंपच्या समोर असलेल्या अनेक वसाहतीत तर नाल्याच नाही. रस्त्यावरून घराघरातील पाणी वाहत असते. अगदी ओंघळवाणे चित्र पाहून संताप अनावर होतो. अष्टभुजा प्रभाग, डॉ. आंबेडकर प्रभागातही अनेक ठिकाणी नाल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या आहेत, त्या अत्यंत जुन्या आहेत. ठिकाणी तुटून-फुटून गेल्या आहेत. त्यामुळे या नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येते. बहुतांश नाल्यांची अशी अवस्था असतानाही महानगरपालिका प्रशासनाने याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर शहरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर दोन वर्षातच चंद्रपुरात विकासकामे करणे सुरू झाले. विकासकामे करताना पुढे हे महानगर कसे सुटसुटीत दिसेल, याचा विचार मात्र करण्यात आला नाही. महापालिका झाल्याने रस्ते रुंद होतील, असाही चंद्रपूरकरांना विश्वास होता. मात्र प्रत्येकवेळी अतिक्रमणांना कुरवाळत, आहे त्याच जागेवर महापालिकेकडून रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अरुंद रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात असताना शहर विकास आराखड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात चंद्रपूरची लोकसंख्याही झपाट्यावे वाढत गेली. एका घरांचे त्याच ठिकाणी दोन घरे बांधण्यात येऊ लागली. त्यामुळे सहाजिकच रस्त्यांवर अतिक्रमण वाढत जाऊन रस्ते चांगलेच अरुंद झाले. शहर विकास आराखड्यात जे रस्ते १२-१५ फुटाचे असतील, ते प्रत्यक्षात सात-आठ फुटाचे झाले. रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करताना तेव्हा नगरपालिकेने अतिक्रमण हटवून, वेळप्रसंगी जागा संपादित करून शहर विकास आराखड्यासारखे रस्ते तयार केले नाही. जो रस्ता उखडला, तिथे आहे तेवढ्याच जागेवर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत राहिले. त्यामुळे एवढ्या वर्षातही रस्ते रुंद होण्याऐवजी ते गल्लीबोळात रुपांतरित होत राहिले. आता महानगरपालिका झाल्यानंतरही प्रशासनाने तोच कित्ता गिरविला.
चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 11:39 PM
चंद्रपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे, असे सांगितले जात आहे. काही विकासात्मक गोष्टी होत असल्या तरी चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची दैना कमी झालेली नाही. पावसाळ्यातील जुलै महिन्यातच अनेक प्रभागातील रस्ते उखडले असून अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या महानगरातही वाहनचालकांना व पादचाऱ्यांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देमहानगरातील रस्ते चिखलमय, अनेक ठिकाणी नव्या रस्त्यांची गरज