२४, २५ व २६ फेब्रुवारी : नवोदितांना चित्रीकरण प्रशिक्षणाला प्रवेशचंद्रपूर : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हल २४, २५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील ख्यातीप्राप्त व्यक्तींच्या उपस्थितीत अनेक मानांकित दर्जेदार माहितीपट, नाणेसंग्रह, वन्यजीव छायाचित्रण अशा प्रदर्शनासोबतच आॅटो एक्सपो, मोबाईल एक्सपो आदी कार्यक्रम होणार आहेत.चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात प्रथमच आयोजित होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात माहितीपट निर्मिती क्षेत्रात संधी शोधणाऱ्या कलावंतांना दोन दिवसीय प्रशिक्षण तसेच कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी आयोजकांच्या आग्रही भूमिकेतून मिळत आहे.महोत्सवात ख्यातनाम व्यक्तींच्या मार्गदर्शनाबरोबरच दर्जेदार चित्रिकरणाचे कौशल्य विकसित करण्याच्या तंत्रासाठी प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे.या महोत्सवासाठी दिग्गज तज्ज्ञ मंडळी येत असून प्रशिक्षणार्थींची संख्या मर्यादित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे चित्रिकरणाचे किमान ज्ञान आणि डॉक्युमेंटरी (माहितीपट) तथा अॅनिमेशन संबंधी पूर्व अनुभव किंवा या क्षेत्रात प्रयत्नशील असलेल्यांना विशेषत: कला संबंधीत क्षेत्रातील पदवी-पदविका असणाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेण्यास इच्छूक असणाऱ्यांनी स्वत:च्या संपूर्ण माहितीसह व यापूर्वी या क्षेत्रात काम केले असल्याचा पुरावा सादर करून महोत्सवाचे मुख्य संयोजक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, यांच्याकडे २० फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी साधा अर्ज करावा. उपलब्ध अर्जातून छाननी करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हल
By admin | Published: February 12, 2017 12:35 AM