सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.राजेश डहारे यांना नुकताच पुदुच्चेरी येथे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.डहारे यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. जागतिक विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान परिषद कौलालपूर, मलेशिया येथे अध्यक्षस्थान भूषविले होते, तसेच आंतरराष्ट्रीय संमेलन कोलंबो, श्रीलंका येथे जुरी मेंबर म्हणूनही काम केलेले आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदामध्ये भाग घेतलेला आहे. त्यांचे १३ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. १२ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संमेलनामध्ये शोधनिबंधाचे वाचन केलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील प्राणिशास्त्र विषयाचे ते पीएच.डीचे मार्गदर्शक आहेत. डॉ.डहारे यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे वैज्ञानिक डॉ.अनुराग सक्सेना, तसेच ईसरोचे वैज्ञानिक डॉ.कार्तिकेयन यांच्या हस्ते आंतराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार बेस्ट फॅकल्टी गटातून प्रदान करण्यात आला.