नांदाफाटा : कोरपना- आदिलाबाद मार्गावर काही दिवसांपासून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मार्गावरुन रात्री सहा-आठ चाकी ट्रकांमधून वाळूची वाहतूक होत आहे. ही वाळू वडसा, पोंभूर्णा, आष्टी आदी तालुक्यांमधून दलालांमार्फत गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना मार्गे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात जात आहे. आठ दिवसांआधी कोरपना येथील तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी आंध्र प्रदेशातील दोन ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करून १ लाख ५८ हजार रूपयाचा दंड ठोठावला. कोरपना तालुक्यात चार सिमेंट उद्योग असल्याने सिमेंटची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यात दिवसागणिक ४०० ते ५०० हून अधिक ट्रक तालुक्याबाहेर जातात. सिमेंट ट्रकवर प्लॉस्टीक फाडी बांधलेली असते. तशीच शक्कल लढवित वाळू तस्करीचा सपाटा सुरू आहे. कारवाई झाल्याने सध्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. विदर्भातील वडसा, पोंभूर्णा, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी तालुक्यातील रेती ही उत्तम दर्जाची असून आजमितीला ३३०० ट्रॅक्टर असा भाव सुरू आहे. त्यामुळे इतर राज्यामध्ये या रेतीला विशेष मागणी आहे. त्यामुळे दररोज १५ ते २० ट्रक रेती वाहून नेली जात आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, सावली या तालुकास्तरावरुन सुद्धा हिच वाहने बेधडकपणणे कोरपना मार्गे तेलंगणातील हैद्राबादपर्यंत जातात. प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने ‘तेरी भी चुप, मेरी भी चूप’ असा प्रकार आर्थिक व्यवहारातून होत असल्याची शंका आहे. (वार्ताहर)
आंतरराज्यीय वाळू तस्करावर दंड
By admin | Published: July 28, 2016 1:28 AM