चंद्रपूर : कोरोना संकटाने सर्वत्र थैमान घातले आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटली असली तरी संकट मात्र कायम आहे. दरम्यान, रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांना आवश्यक असलेली आरोग्यासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना काॅल सेंटरची निर्मिती केली आहे. या सेंटरमधून २ लाख ९३ हजारावर नागरिकांना काॅल करून त्यांची माहिती जाणून घेत योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे.
वर्षभरापासून कोरोना संकट घोंगावत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ८२ हजार ६०५ रुग्ण बाधित झाले असून ७८ हजार १८६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना काॅल सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमधून पाॅझिटिव्ह आलेल्या आणि गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस केली जात आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक असलेली माहिती दिली जात असून गरजेनुसार त्यांना मार्गदर्शनही केले जात आहे. यासाठी या सेंटरमध्ये विविध विभागाचे तब्बल ९० कर्मचारी २४ तास सेवा देत आहे.
बाॅक्स.......................... म्युकरमायकोसिसचे ३६ संशयित शोधण्यात यश
मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस आजाराने तोंड वर काढले आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यामध्ये कोरोना आजारातून बरे झालेल्या तब्बल १४ हजार ६६८ जणांना या कंट्राेल रूममधून फोन करून प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान, यामध्ये म्युकरमायसोसिसचे तब्बल ३६ संशयित रुग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बाॅख्स
२४ तास सेवा सुरू
मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट घोंगावत असून प्रत्येक नागरिक दहशतीत आहे. चाचणी झाल्यानंतर रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर तो तसेच कुटुंबीयांना काही वेळासाठी सुचेनासे होते. अशावेळी कोरोना काॅलसेंटरमधून त्यांना माहिती दिली जात आहे. ही सेवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून २४ तास अविरत सुरु आहे.
कोट
चाचणी केल्यानंतर गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना कंट्राेल रूममधून नियमित फोन करून विचारपूस केली जाते. यामध्ये गरजेनुसार त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी ९० कर्मचारी २४ तास काम करीत आहेत. रुग्णांना बेडसंदर्भातही माहिती दिली जात आहे.
-डाॅ. किशोर भट्टाचार्य
कक्ष प्रमुख, कोरोना काॅल सेंटर