लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : येथील वन विभागात कार्यरत उच्चपदस्थ वन अधिकाऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून ८ लाख २० हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) उघडकीस आली. एका उच्चशिक्षित महिलेलाही ३१ लाखांनी फसल्याची घटना गुरुवारी उजेडात आली होती. अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
फिर्यादी वनविभागात अधिकारीपदी कार्यरत आहेत. ५ ते १५ ऑक्टोबर २०२४ कालावधीत त्यांना अनोळखी मोबाइलवरून ट्रायच्या नावाने कॉल आला. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, तुमचा आधार कार्डशी संबंधित सगळे मोबाइल नंबर बंद करण्यात येईल. त्यांना एक नंबर सांगण्यात आला आणि या नंबरवरून असामान्य कॉल झाले. तुमच्यावर नवी दिल्ली येथील पोलिस विभागाच्या गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली. त्यासाठी तुम्हाला व्यक्तीस यावे लागेल. तेव्हा तक्रारदार अधिकाऱ्याने दिल्ली येणे शक्य नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर कॉलरने ऑनलाइन तक्रार दाखल करायला त्यांनी दुसरा नंबर दिला.
दरम्यान, आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वन अधिकाऱ्याने बल्लारपूर सोमवारी (दि. २१) बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६ (क), ६६ (ड) ची गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे करीत आहेत.
सीबीआयचाही दाखविला धाक अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन माहिती मागितल्याने वन अधिकाऱ्याने संपर्क केले. तेव्हा कॉलरने गोपनीयता म्हणून सीबीआय इंडियाशी सहकार्य करावयाचे असून तुमचे सर्व फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड व वेतन, बचतीसंदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संरक्षणात द्यायचे आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. तेव्हा वन अधिकाऱ्याने भीतीपोटी कॉलरने दिलेल्या क्रमांकावर ७ लाख ९० हजार रुपये आरटीजीएस केले. शिवाय फोन पेद्वारे २० हजार रुपये असे एकूण ८ लाख १० हजार रुपये जमा केले.