चैतन्य कोहळे
माजरी (चंद्रपूर) : सोमवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान कामावरून परत येत असताना एका दीपू सियाराम महतो या कर्मचाऱ्याला त्याच्याच घराजवळून वाघाने उचलून नेल्याची घटना माजरीच्या न्यू हाऊसिंग परिसरात घडली. रात्री ११ वाजताच्या दरम्यान वस्तीलगत अंदाजे २०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास माजरी वेकोलिच्या परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे हा वाघ तिथेच फिरत असल्याचे दिसते.
दीपूच्या मृत्यूनंतर विकास कोल या खासगी कंपनीकडून ५० हजार आणि वनविभागाकडून ३० हजार रुपयांची तातडीची मदत त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. माजरी परिसरात वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजरी, चारगाव, जुना कुनाडा, तेलवासा, ढोरवासा, एकतानगर, चड्डा कंपनीजवळील परिसरात अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात वाघाचे अस्तित्व असून पोलीस विभाग आणि वनविभागाची त्यावर करडी नजर आहे. परिसरात वाघांची संख्या दोन असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान माजरीचे ठाणेदार विनीत घागे यांनी आपल्या पथकासह न्यू हाऊसिंग व प्रभावित क्षेत्रात जाईन कार्नर सभा घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय सोमवारी ज्या ठिकाणी घटना घडली, त्या परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे झुडपी जंगल
वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीचे ढिगारे परिसरात आहेत. या ठिकाणी झुडपी जंगल तयार झाले आहे. त्यामुळे हिंस्र प्राणी या परिसरात वावरू लागले आहेत. सोमवारी घडलेल्या घटनेला प्रशासन व मुख्य महाप्रबंधक माजरी हे सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला होता. दरम्यान संतप्त नागरिकांनी मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान शावेल चौक येथे धरणा देत वेकोलिचा कोळसा वाहतूक रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान वेकोलिकडून योग्य ती मदत तसेच जंगल सफाई आणि लाइट लावून देण्याचे आश्वासन महाप्रबंधक प्रमोद कुमार यांनी दिले.
वाघाने दिवाळीच्या दिवशी लोकवस्तीतून दीपू महतो या युवकाला उचलून नेले आणि त्याला ठार केले. दुसऱ्या दिवशीही काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ नये. विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी. वनविभागाचे ५० आणि २० पोलीस कर्मचारी त्या परिसरात तैनात केलेले आहे. तसेच कॅमेरेही लावले आहेत.
- विनीत घागे, ठाणेदार पो. स्टे. माजरी.