चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. यामुळे प्रत्येक नागरिकावर निर्बंध आले असून, अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवागी आहे. असे असतानाही काही व्यावसायिक स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:सह इतरांच्या जीवाशी खेळ करीत असून लपूनछपून व्यवसाय करीत आहेत. दुकानाचे शटर बाहेरून बंद करून आतमध्ये व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रकार वाढला आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने आता या व्यावसायिकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. मागील १५ दिवसांमध्ये प्रशासनाने विविध व्यावसायिकांकडून ४ लाख १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या संसर्गामध्ये वाढ होऊ नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरी चंद्रपूर तालुक्यातील काही व्यावसायिक नियमांचे वेळोवेळी उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने चंद्रपूर, घुग्घुस, पडोली परिसरातील व्यावसायिकांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.
ही कारवाई साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार नीलेश गौंड यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असून, या पथकामध्ये नायब तहसीलदार सचिन खंडाळे, नायब तहसीलदार राजू धांडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी रमेश आवारी, मंडळ अधिकारी नवरे, तलाठी पौर्णिमा बदखल, तलाठी विशाल कुरेवार आदींचा समावेश आहे.
बाॅक्स
या प्रतिष्ठानांवर झाली कारवाई
लग्न समारंभ - चंद्रलोक लाॅन, जिजाऊ मंगल कार्यालय, प्रिन्स लाॅन, महेश भवन
हाॅटेल - रसराज हाॅटेल, बिकानेर स्वीट मार्ट, होटल अंकल का ढाबा, राहुल ढाबा, सुल्तान बिर्याणी सेंटर, बंगलोर बेकरी.
कापड व्यवसाय - सपना कलेक्शन
ट्रॅव्हल्स - डीएनआर एक्स्प्रेस,
ज्वेलर्स - करण कोठारी ज्वेलर्स, क्रिष्णा ज्वेलर्स तसेच इतर.
बाॅक्स
असा केला दंड वसूल
मंगल कार्यालय - ७५ हजार
हॉटेल - ३५ हजार
कापड दुकान - ५५ हजार
ट्रॅव्हल्स - १० हजार
ज्वेलर्स - ५३ हजार
एकूण - ४ लाख १० हजार ८००
बाॅक्स
अशी होणार कारवाई
कोविड १९ नियमांचे जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर भारतीय दंड सहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कमल ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र असून, या कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
बाॅक्स
शटर बंद, दुकाने सुरू
लाॅकडाऊन असल्यामुळे प्रत्येकावरच निर्बंध आले आहेत. असे असले तरी नागरिक तसेच काही व्यावसायिकही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अनेक जण दुकानाचे शटर बंद करून आतमध्ये व्यवहार करीत आहेत. त्यामुळे ते आपल्यासह अन्य नागरिकांचाही जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे आपली तसेच आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोट
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामुळे स्वत:सह इतरांचेही नुकसान होणार नाही. मात्र आजही काही जण ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. लपूनछपून काही व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत. यामुळे महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून आपल्यावरील कारवाई टाळावी. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.
- रोहन घुगे
साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर