रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह आमदार राजेश पाटील, आमदार नरेंद्र दराडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार दादाराव केचे, आमदार रामदास आंबटकर, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार शिरीष चौधरी, आमदार समीर कुणावार, आमदार दिलीप बोरसे, आमदार राजेश राठोड, आदींचा समावेश असलेल्या तीन पथकाने पाच तालुक्यांतील २१ गावांना भेटी दिल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान, अनेक कामांतील त्रुटी या समितीच्या लक्षात आल्या. रस्ते, अर्धवट घरकुल, गुरांचा गोठा, स्मशानभूमी शेड तसेच अन्य विकासाभिमुख कामांमध्ये अनियमितता झाल्याचे आढळले. अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केल्याने बरीच कामे रखडली. काही कामे नियमबाह्य झाल्याचे समितीच्या लक्षात आले.
समितीच्या सदस्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा करून खात्रीही करून घेतली. त्यातूनही अनेक चुका पुढे आल्या. एका गावातील पांदण रस्त्याचे काम वगळल्यास जिल्ह्यातील बहुतांश कामे समितीला असमाधानकारक वाटल्याची चर्चा आहे.
बॉक्स
दोषींवर कारवाई होणार
विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच आली. ही समिती विधानसभेला विविध विधायक सूचना करते. दोषींवर कारवाई करण्याचेही अधिकार समितीला आहेत. आठ तालुक्यांतील २१ गावांत राबविण्यात आलेल्या रोहयो कामांबाबतचा अहवाल ही समिती विधानसभेला सादर करणार आहे.