लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०१५-१६ या वित्तीय वर्षातील लेखापरीक्षण अहवालात १५ कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप घेतल्याने कारवाईसाठी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी चंद्रपुरात आले असता या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी रेटून धरली. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करून सत्य बाहेर काढणार असल्याचे सांगितले. लेखापरीक्षण अहवाल मंजूर करण्यासाठी मनपाने ३१ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभेपुढे हा विषय ठेवला होता. दरम्यान तत्कालीन महापौर व पदाधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ केला होता. वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात एकूण १५ कामांमध्ये अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप असल्याचा मुद्दा काँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढीया आदींनी सभेत नोंदविला होता. याशिवाय कल्पना लहानगे, संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, विना खनके, सकीना अन्सारी, अशोक नागापुरे, अली अहमद मन्सुर, नीलेश खोब्रागडे, कुशल पुगलिया, पप्पू देशमुख आदींसह मनपासमोर निदर्शने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांच्यासह अन्य नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालातील १५ कामांमधील २०० कोटींची अनियमितता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दोषींकडून वसुली करण्याचा तगादालेखापरीक्षणात दाखविण्यात आलेले वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रक्कम सन २०१५-१६ च्या कालावधीतील पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा मुद्दा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे काही नगरसेवकांनी रितसर तक्रार केली.
काय आहे काँग्रेस नगरसेवकांच्या निवेदनात ?
मनपाच्या ७१ कामांवर नियमबाह्य खर्च करण्यात आला. आक्षेपाधीन २०० कोटी ३३ लाख ७९ हजार ४६९ हजारांपैकी वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रुपये लेखापरीक्षणात दाखविण्यात आले. लेखा विभागाने यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब असून सन २०१५-१६ मध्ये मनपाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनातून केली आहे.