फोटो चंद्रपूर : येथील आझाद बागेचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. कंत्राटदारांमार्फत सुरू असलेले हे काम करताना आझाद बागेत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या ११ केव्हीचे विद्युत केबलच क्षतिग्रस्त करण्यात आले. याची माहितीही वीज वितरण कंपनीला देण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास सहा तास चंद्रपुरातील या भागातील वीजपुरवठा खंडित राहिला. मनपाच्या कंत्राटदाराच्या या बेजबाबदार कामामुळे नागरिकांना विनाकारण त्रास भोगावा लागला.
येथील आझाद बागेच्या सौंदर्यीकरण व विकासाचे काम एका कंत्राटी कंपनीमार्फत सुरू आहे. याच बागेतून महावितरण कंपनीची ११ केव्हीची विद्युत वाहिनी गेली आहे. या कंत्राटी कंपनीतील कामगारांनी खोदकाम करताना महावितरणकडून नागरिकांना वीजपुरवठा करणारी केबल लाईनच तोडून टाकली. यामुळे या परिसराचा वीजपुरवठा दुपारी १२ वाजेपासून खंडित झाला. विशेष म्हणजे, खोदकाम करताना या कंत्राटी कंपनीने महावितरणशी चर्चा केली नाही. असा प्रकार घडल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली नाही. त्यांना याबाबत माहिती मिळेपर्यंत बराच कालावधी लोटून गेला. त्यामुळे वीजपुरवठा जवळपास सहा ते सात तास खंडित राहिला. विशेष म्हणजे, या परिसरात नागरिकांसह अनेक व्यावसायिकांचीही दुकाने आहेत. त्यांचीही मोठी गैरसोय झाली.