फोटो
सिंदेवाही : चंद्रपूर - नागपूर हायवे रोडवरील पळसगाव जाट गावाजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरवरून सिमेंट भरलेला ट्रक नागपूरकडे जात असताना अचानक उलटला. यादरम्यान तेथून चालत चाललेला एक इसम ट्रक अंगावर येईल, या भीतीने बाजुला पळाला. मात्र या गडबडीत तो चार फूट खोल खड्डयात पडला. सर्वत्र मुरूम आणि पावसामुळे तो खड्डयात फसला. त्याच्या पायाचे हाड मोडल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. अखेर जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने समांतर दुसरा खड्डा खोदून त्याला बाहेर काढले, तसेच ट्रकलाही व्यवस्थित करण्यात आले. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबून होती.
चंद्रपूरवरून सिमेंट घेऊन हा ट्रक नागपूरकडे जात होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पळसगावजवळ ट्रक उलटला. यादरम्यान भोजराज लक्ष्मण माटे (६५, रा. पळसगाव) हा तिथून लाकडे घेऊन जात होता. ट्रक अंगावर येईल, या भीतीने तो बाजूला पळाला आणि चार फूट खोल खड्डयात पडला. त्याचा जीव वाचवण्यासाठी सिंदेवाही पोलिसांनी सर्वप्रथम या मार्गावरील वाहतूक बंद केली. भोजराज यांचा पाय मोडल्याने ते खड्डयातून बाहेर कसे निघणार, हा प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी व क्रेन बोलाविली. त्याच्या साहाय्याने त्या खड्डयाच्या बाजूचा मुरूम हटवून समांतर खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर माटे यांना सुखरूप बाहेर काढले व उलटलेला ट्रकही सरळ केला. भोजराज माटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.