नागभीड : शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याचा ठराव १४ सप्टेंबर २०१८ रोजीच घेण्यात आला. या बाबीस आता तीन वर्ष झाले आहेत. मात्र या ठरावाची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेऊन नगर परिषदेने हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.
नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय शहरात तीन महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा, कॉन्व्हेंट आहेत. हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सायकलने शाळा-महाविद्यालयात येत असतात. शाळा सुरू होण्याच्या अगोदर आणि सुटायच्या वेळी या जड वाहनाने वाहतूक चांगलीच प्रभावित होत असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक प्रतिष्ठाने बंद आहेत. नाही तर या अडचणीत आणखी भर पडली असती. मात्र शाळा सुरू होताच ही समस्या निश्चित ऐरणीवर येणार आहे.
शहरात वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पण रस्ते आपले अस्तित्व हरवून बसले आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेड उभारणी करून त्यातच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यातच मोठ्या व्यापाऱ्यांची जड वाहने शहरात येत आहेत. वाहनातून साहित्य उतरविण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील नियमित होणारी वाहतूक प्रभावित होत आहे. दोन वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. शहरातील जड वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून केल्या जात होती.
कोट
शहरातील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात प्रहार संघटनेने नगर परिषदेला अनेकदा निवेदने दिली आहेत. एकदा ठरावाची होळी केली. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. पण काहीच निष्पन्न झाले नाही. प्रहार हा प्रश्न पुन्हा हाती घेणार आहे.
- वृषभ खापर्डे, प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड.
110921\img_20210908_145823.jpg
शहरात वाहतुकीची अशी कोंडी निर्माण होते.