ब्रह्मपुरी : गांधी नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांत लोखंडी दरवाजामुळे वाद उद्भवला आहे. या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.शाळेच्या सुरक्षाभिंतीचे काम लोकवर्गणीतून करण्यात आले. शाळेला लोखंडी दरवाजा कुठून ठेवायचा, यावरुन वाद झाला. प्रभागातील नागरिकांची मते विचारात न घेता काम करण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध रितसर तक्रार पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यानंतर जुन्या दान दिलेल्या वस्तूची परस्पर विक्री करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. जुनी मोडकळीस आलेली इमारत नष्ट करण्याविषयी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. परस्पर जुनी इमारत पाडून त्यातील किंमतीचे साहित्य मर्जीतल्या लोकांना विकण्यात आले, असाही आरोप केल्या गेला आहे. वॉर्डातील हरिभाऊ ढोमळे, गजानन गिरी, जितेंद्र धकाते, संजय दिघोरे यांनी याविषयी विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थापणाने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सुरक्षाभिंतीच्या आत मुलांना खेळण्याचे मैदान आहे. त्या संपूर्ण मैदानावर बगीचा बनविण्याचे काम करण्याविषयी उपाययोजना करण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी मुलांना खेळण्यासाठी काही जागा मोकळी ठेवा व काही जागेवर बगीचा तयार करा, असे सांगितले. त्यांच्या सूचना विचाराधीन न ठेवता आपल्या मर्जीने काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी शाळेच्या बाहेर बोअरवेल होती. नागरिक पाणी भरायचे. ती बोअरवेल आता शाळेची सुरक्षाभिंत टाकल्याने शाळेच्या आत गेली. नागरिक पाणी भरण्यासाठी गेले असता पाणी भरु दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शाळेच्या लोखंडी दरवाजाचा वाद पेटला
By admin | Published: July 16, 2015 1:22 AM