नागरिकांची तक्रार : गडचांदूरमध्ये हागणदारीमुक्तीचा फज्जागडचांदूर : देशात सद्यस्थितीत स्वच्छता अभियानाची मोठी चळवळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चळवळ महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर सुरु केली. या अभियानाची जागतिक स्तरावर दखल होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील प्रभाग २ (जुने वार्ड क्रमांक ५) मधील ओपनस्पेस हागणदारीमुक्तीचा लढा थेट देशाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर पोहोचला आहे. सदर वॉर्डातील प्रा. डॉ. सुनील बिडवाईक व वार्डवासीय नागरिक यांनी प्रचलित नगर परिषद व शासकीय यंत्रणा याबाबत कुचकामी असल्याने सरळ देशाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर आपल्या न्याय मागणीसाठी धाव घेतली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून या ओपनस्पेसच्या प्रश्नासंदर्भात तत्कालीन ग्रामपंचायत, नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी केल्यात. मात्र प्रत्येक वेळी या समस्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. अखेर वॉर्डातील ओपनस्पेस हागणदारीतून मुक्त करण्यासाठी वॉर्डवासीयांना पंतप्रधान कार्यालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. यासंदर्भात वार्डवासीयांच्या स्वच्छता अभियान चळवळीचे सर्वत्र कौतुक होत असले तरी स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणाची चर्चा थेट पंतप्रधान कार्यालयात पोहचली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरात देशाच्या स्वच्छता अभियान संकल्पनेचा फज्जा उडाला आहे. पूर्वी ग्रामपंचायत असलेली व गेल्या दोन वर्षापासून नगरपरिषद झालेल्या गडचांदुरात विकासात्मक कुठलाही बदल झालेला नसून शहरात असलेले ओपनस्पेस दुरावस्थेत असून वॉर्ड क्रमांक ५ मधील कॉलनीतील ओपनस्पेसचा वापर चक्क शौचालयासाठी करण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील वातावरण दूषित झाले असून घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आहे. शहरातील उपरोक्त ओपनस्पेस विकसित करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची होती. मात्र सुरुवातीपासूनच विकसित ले-आऊट न केल्यामुळे सादर ओपनस्पेसवर अनेक वर्षापासून हागणदारी आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना घाण आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून अनेक रोगांची आणि आजारांची लागण होत आहे. सदर वॉर्डवासीयांनी गेल्या दोन वर्षापासून उपरोक्त ओपनस्पेसवर बाल उद्यान, बगीचा व वृद्धांना आसरा व्हावा, यासाठी सौंदर्यीकरण करावे या संदर्भात अनेक निवेदन स्थानिक व जिल्हा प्रशासनाला दिली. यासंदर्भात महिला, पुरुषांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र प्रशासनावर कुठलाच परिणाम झाला नाही. देशात आणि महाराष्ट्रात पंतप्रधानाच्या संकल्पनेनुसार स्वच्छता अभियान मिशन राबवित असताना गडचांदूर स्थानिक प्रशासनाने थेट पंतप्रधानांच्या या मोहिमेला हरताळ फासला आहे.गडचांदूर शहरातील ओपनस्पेस सौंदर्यीकरण व्हावे आणि ओपनस्पेस हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी वार्ड क्रमांक ५ मधील नागरिकांच्या स्थानिक पातळीवर केलेल्या लढ्याला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सदर वॉर्डवासीयांनी थेट पंतप्रधान मोदींच्या पोर्टलवर समस्या मांडली असून या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालय लवकरच घेईल, असा आशावाद येथील नागरिकांना आहे. स्वच्छता अभियान मिशनसाठी लढा देणाऱ्या या नागरिकांना आपल्याच शहराच्या समस्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, ही फार मोठी शोकांतीका असून या संदर्भात स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.१६३६ शौचालयाचे बांधकाम सुरु होणारगडचांदूर नगरपालिका स्वच्छ भारत मिशन राबविण्यास कटीबद्ध असून शहरात चालू वर्षात १६३६ शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे. ३५५ शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यांना शासकीय अनुदान १७ हजारापैकी पहिला हप्ता ६ हजार दिला आहे. १६० नागरिकांवर शौचालयाचा दुसरा हप्तासुद्धा दिला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खुल्या जागेत शौचालयाला बसणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- संजय जाधव, मुख्याधिकारी, न.प. गडचांदूर
ओपनस्पेसचा मुद्दा पंतप्रधानांच्या दरबारी
By admin | Published: February 13, 2017 12:39 AM