कोरोनाला आमंत्रण : सोशल डिस्टन्सचा फज्जा
बल्लारपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी, असे आवाहन करीत शासनाने व प्रशासनाने वेळोवेळी कठोरपणे पावले उचललीत. नियमावली जाहीर केली असताना शहरातील काही दुकानात व चहाटपरीवर बेफिकिरीने नागरिक मास्क न वापरता सामाजिक अंतर न ठेवता नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी एकप्रकारे आमंत्रणच दिले जात आहे.
स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी शासनाने जमावबंदी घातली आहे.प्रशासनाने सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक सेवांना दुकाने खुली ठेवण्याची सूट दिली आहे. याचा फायदा घेऊन वस्ती विभागातील काॅलरी मार्गावर चहाटपरीवाले, खर्रा घोटणारे सर्रास दुकाने खुली ठेवून नियमाचे उल्लंघन करीत आहेत. नागरिकही बेफिकिरीने अशा दुकानात गर्दी करीत आहेत. याची तक्रार माजी नगरसेवक रमेश अंगुरी यांनी नगर परिषद व पोलीस ठाणे यांना केली असता त्यांनी एक-दुसऱ्याकडे बोट दाखविले. प्रशासनाचे पथकही दिसत नाही. यामुळे शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.