कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात सर्वच प्रवासी साधने बंद करण्यात आली नसली तरी या साधनांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नागभीड येथे जुना बसस्टाॅप, नवीन बसस्थानक आणि राम मंदिर चौक या बसस्थानकांवर प्रवाशांची पूर्वी नेहमीच गर्दी दिसायची. शेकडो वाहनांची नेहमीच वर्दळ दिसायची. या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चणे, फुटाणे, बिस्किट, शेंगदाणे व अन्य मोसमी वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी होती. या तिन्ही बसस्थानकांवर किमान १५ ते २० व्यक्ती आपली सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे. बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि अन्य प्रवासी साधने बसस्थानक नजीक आली की, मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी त्या वाहनाजवळ अगोदर पोहोचलो पाहिजे व मला ग्राहक मिळाले पाहिजे, या इच्छेने जिवाची बाजी लावून या व्यक्ती त्या वाहनाजवळ पोहोचायचे आणि आपल्या वस्तूंची ‘मार्केटिंग’ करून वस्तू विकायच्या. मात्र, सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे वाहनेच येत नसल्यामुळे या बसस्थानकांवर प्रवाशीच दिसत नाहीत. प्रवासीच नसल्यामुळे या विक्रेत्यांना ग्राहकच नाहीत. यातील बहुतेकांचा यावरच उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आता त्यांचा ‘धंदा’च बंद झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
लग्न समारंभ, शाळा, महाविद्यालयेही बंद
प्रवाशांसोबतच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थीही या विक्रेत्यांचे मोठे ग्राहक होते. नागभीड येथील शाळा महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हे विद्यार्थी बसस्थानकावर आल्यानंतर या विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेत होते. आता शाळा, महाविद्यालये बंद असल्याचा फटका या विक्रेत्यांना बसला आहे. याशिवाय लग्न समारंभ, सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. याचाही परिणाम या विक्रेत्यांवर झाला आहे.