आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नप्रसंगी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आनंदाची उधळण, डोळे दिपवणारी रोषणाई, आतषबाजी, नवीन कपडे आदी सर्व काही करतात. मात्र, या आनंदावर आता कोरोनाने विरजण घातले आहे. वधू-वरासह केवळ ५० जणांच्याच उपस्थितीला प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच प्रत्येकाचे नाव, नंबरही लिहून ठेवावे लागत आहेत. त्यामुळे कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, या चिंतेत वधू- वराकडील मंडळी सध्या पडली आहे.
मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक कारवाई करणे सुरू केले आहे. ज्यांच्या घरी लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची तयारी पूर्ण झाली आहे, अशांना वेळेवर लाॅकडाऊन तर होणार नाही ना, याची चिंता लागली आहे, तर ज्यांचा लग्नसमारंभ सध्या पार पडला आहे त्यांनी आलेल्या पाहुण्यांनी जेवण उरकताच मंगल कार्यालयातून जा म्हणण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र वधू- वर पक्षांकडील मंडळींना चांगलाच धक्का बसत आहे.
बाॅक्स
मंगल कार्यालयाकडून ॲडव्हान्स परत
कोरोनाचे संकट पुन्हा तोंड वर काढत असल्यामुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी ज्यांनी मंगल कार्यालय बुक केले आहे. त्यांनी आता ॲडव्हान्स परत घेणे सुरू केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लाॅन संचालकांचे मोठे नुकसान होत आहे. ५० जणांच्या उपस्थितीसाठी लाखो रुपयांचे मंगल कार्यालय, लाॅन कशासाठी, असा विचार वधू- वरांकडील मंडळी करीत आहे.
--