गणेशोत्सव सुरू होताच पाऊस गायब झाला होता. त्यामुळे उकाडा वाढला. धान उत्पादक शेतकरीही चिंतित होते. रविवारी सायंकाळी बाप्पाचे विसर्जन सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला होता. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धुव्वाधार बरसणे सुरू झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसल्याने नाले व तलाव तुडुंब भरले. काही ठिकाणी मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यात आहेत. अशा स्थितीत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली व सिंदेवाही तालुक्यात भातशेती अधिक असल्याने हा पाऊस उपयुक्त असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, चंद्रपूर शहरातील काही सखल भागात भाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरवेळीप्रमाणे येथील आझाद बागेजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील सिस्टर काॅलनी, नगिनाबाग, बंगाली कॅम्प, तुकूम, दुर्गापूर रस्त्यासह अन्य ठिकाणीही रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.