लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या गुराख्यावर वाघाने हल्ला चढविलेला पाहताच त्या म्हशी एकत्रितपणे वाघावर चालून गेल्या व त्याला पळवून लावल्याची एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना नागभीड तालुक्यातील खरकाडा येथे रविवारी घडली. जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामध्ये गुराखी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
दरम्यान वाढोणा आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून जखमी गुराख्यास चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. किशोर विजय भोंडे (३०) असे या गुराख्याचे नाव आहे.गुराखी किशोर हा नेहमीच बैल, म्हशी खरकाडा जंगल परिसरात चराईसाठी नेत असे. रविवारीसुद्धा जनावरे चराईसाठी सोडून किशोर मोकळ्या जागेवर उभा होता. दरम्यान समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यानंतर मोठया आवाजात त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या. त्यामुळे भांबावलेल्या वाघाने जखमी गुराख्याला सोडून दिले आणि जंगलात पळ काढला.
गंभीर अवस्थेत किशोरला जवळच्याच वाढोणा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान प्राथमिक उपचार करून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल डोर्लीकर यांनी नागभीड येथे रेफर केले. त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हशींनी एकत्र येत हल्ला बोलल्यामुळे गुराखी किशोरचे जीव वाचले. खरकाडा हे गाव वाढोण्यावरून अगदी दोन कि मी.अंतरावर असून जंगल परिसरात आहे. या परिसरात वाघाने अनेकदा खरकाडावासीयांना दर्शन दिले आहे. त्यामुळे खरकाडावासीय वाघाच्या भीतीने धास्तावले आहे. या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.