भद्रावती (चंद्रपूर) : भद्रावती शहरातील गौराळा येथील गणेश मंदिर हे अतिप्राचीन असून, पुराणकालीन आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी हा वरदविनायक आहे. परिसरात या गणेशाला गौराळ्याचा गणपती म्हणून ओळखले जाते. जवळपास सात फूट असलेली ही गणेशाची मूर्ती आसनस्थ आहे. हे मंदिर अत्यंत जागृत असल्याची भाविकांमध्ये मान्यता आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असल्यामुळे या मंदिरात भाविकांची वर्षभर दर्शनासाठी वर्दळ असते.
गणेश पुराणातील माहितीनुसार, पुराणकाळात गृत्समद नावाचे ऋषी होऊन गेले. इंद्र आणि मुकुंदा नामक ऋषी कन्येच्या संबंधातून गृत्समद ऋषीचा जन्म झाला. गृत्समद हे अत्यंत हुशार आणि ज्ञानी होते. एके दिवशी मगध राजाच्या घरी श्राद्धाच्या भोजनासाठी ऋषींना बोलवण्यात आले. त्यात गृत्समद ऋषीही होते. तेथे सर्वांसमोर अत्री ऋषींनी गृत्समद ऋषीचा जारपुत्र म्हणून अपमान केला. झालेल्या अपमानामुळे गृत्समद हे अतिशय संतापले व त्यांनी घरी येऊन आपल्या जन्माची आपल्या आईला माहिती विचारली. तेव्हा भीत भीत त्यांच्या आईने त्यांना सर्व काही खरे सांगितले. ते ऐकून ते अत्यंत दुःखी झाले व ते तडक पुष्पक वनात निघून गेले.
हे पुष्पक वन म्हणजेच आजचा मंदिर परिसर होय. तेथे गृत्समद ऋषींनी गणेशाची मोठी कठीण अशी तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे गणेश प्रसन्न झाले. त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. त्यानुसार गृत्समद ऋषींनी मला ऋषींमध्ये उच्च स्थान देऊन प्रकांड विद्वत्तता दे व येथे येऊन तुझे दर्शन घेणाऱ्या भाविकांचे मनोरथ तू पूर्ण कर असे दोन वर मागितले. त्यावर गणेशाने तथास्तू करीत ते अंतर्धान पावले. त्यानंतर याच ठिकाणी गृत्समद ऋषींनी या गणेशाची स्थापना केली.
हाच तो वरदविनायक होय. गौराळा परिसरातील छोट्याशा टेकडीवर निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. विदर्भात सुप्रसिद्ध असल्याने दर्शनासाठी भाविकांची वर्षभर मोठी वर्दळ असते.