घनश्याम नवघडे नागभीडउमरेड-कन्हांडला अभ्यारण्यातील बेपत्ता वाघ ‘जय’ ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली तरी गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील बेपत्ता असलेल्या त्या मृत वाघिणीच्या तीन पिलांचे काय झाले? जयप्रमाणेच या पिलांचेसुद्धा ‘सर्च आॅपरेशन’ करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आशिया खंडातील प्रमुख वाघांमध्ये समावेश असलेला जय वाघ बेपत्ता होताच संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. ही दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून वन विभाग गेल्या तीन दिवसांपासून जयचा राज्यपातळीवर शोध घेत आहे. नागभीड तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या मिंडाळा कंपार्टमेंटमधून ३ सप्टेंबरपासून एका मृत वाघिणीचे तीन पिले बेपत्ता आहेत. या बेपत्ता पिलांचा वन विभागाचे विविध विभाग गेल्या २५ दिवसांपासून शोध (?) घेत असले तरी त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.मिंडाळा कंपार्टमेंटमधील सावंगी जंलगातून बेपत्ता असलेल्या या ुपिलांचे वय जेमतेम सात ते आठ महिन्यांचे आहे. त्यांची आई या जंलगात मृतावस्थेत आढळून आली. ते स्वत: शिकार करु शकत नाही. त्यांची भ्रमणक्षमताही तीन ते चार कि.मी. च्या पलिकडे जात नाही, असे जाणकारांचे मत आहे. मग हे पिले गेली कोठे, असा सवाल निर्माण झाला आहे.याबाबत मध्यंतरी ‘लोकमत’ ने वन विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली. प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच ‘आमचा तपास सुरू आहे’, मिळत असते. जय परिपूर्ण वाघ होता. दिवसासाठी जयची भ्रमणक्षमता ६० ते ७० किमी होती. तो कुठेही जावू शकतो. त्याची ही क्षमता लक्षात घेवूनच शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील जंगल सर्च करण्याचे आदेश दिले. पण या पिलांचे तसे नाही. ती पिले फार तर ५०-६० कि.मी. परिसरात भ्रमण करीत असतील.आता तर बहुतेक जंगल परिसरात अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. गेल्या २५ दिवसांत एकही पिल्लू कॅमेरामध्ये ट्रॅप कसे काय झाले नाही, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभाग पिले जिवंत असल्याचे भासवून व शोधमोहीम राबवून त्यावर करीत असलेला शासकीय मनुष्यबळाचा अपव्यय फाजीलपणाचा असल्याच्या प्रतिक्रिया या परिसरात व्यक्त होत आहेत.जय मरण पावला आहे की, जिवंत आहे, यावरुन संपूर्ण देशात रान उठले आहे. मात्र गेल्या २५ दिवसांपासून या तालुक्यातील वाघाचे तीन पिले गायब आहेत. त्यांचा कुठलाही मागमूस नाही. ते मरण पावले की, जिवंत आहेत, याचा जाब जयप्रमाणेच विचारण्याची गरज असून वनविभागाने याचा खुलासा करण्याची मागणी आहे.
‘जय’चे सर्च आॅपरेशन, ‘त्या’ तीन बछड्यांचे काय ?
By admin | Published: October 05, 2016 12:50 AM