लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे. गावातील खासगी बोअरवेल कोरड्या पडल्या असून गावातील चार सरकारी हातपंपांना पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे व्यवस्थित पाणी येत नाही. त्यामुळे हातपंपातून पाणी काढण्यासाठी जैतापूरवासीयांना रात्रीपासून पाणी भरावे लागत आहे.पाच वर्षापूर्वी गावाशेजारील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावातील भूजल साठ्यात वाढ व्हावी, या दृष्टीने जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले. परंतु या तलावाच्या कामात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच वर्षी तलावाला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावातील सर्वच पाणी वाहून गेले. तलावाच्या कामाला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले होते. त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. परिणामी जैतापूरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गावात अनेकांनी खासगी बोअरवेल खोदल्या. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने सर्वच बोअरवेलने तळ गाठला असून गावात असलेल्या चार सरकारी हातपंपाचेही पाणी संपल्याने महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करीत भटकंती करावी लागत आहे. गावात निमनी प्रादेशिक पाणी पुरवठ्याची नळ योजना आहे. मात्र या योजनेचे पाणी गावात पोहोचले नाही. सध्या गावापासून चार किलोमीटर अंतारावर असलेल्या वर्धा नदीवरुन काही शेतकऱ्यांनी शेतात पाईपलाईनद्वारे पाणी आणून त्या पाईप लाईनद्वारे गावातील पुरुषोत्तम गोनेवार हे एक दिवसाआड पाणी आणून जैतापुरवासीयांची तहान भागवित आहे. परंतु शासकीय व्यवस्थेने गावातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, हे जैतापूरवासीयांचे दुदैव आहे.अंधारल्या रात्रीही पाण्यासाठी संघर्षजैतापूर गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. पाणी मिळविण्यासाठी येथील महिलांसह नागरिक अंधाºया रात्री उठून पाणी भरत आहे. जैतापूरवासीयांची पाण्यासाठी चाललेली धडपड शासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहे.
नदीच्या पाण्यावर जैतापूरवासीयांची भागते तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:48 AM
राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे.
ठळक मुद्देगावतलाव ठरला पांढरा हत्ती: बोअरवेल कोरड्या, पाण्यासाठी नागरिकांचे हाल