सहज केली होती लागवड : नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणामघनश्याम नवघडे नागभीडभिकेश्वर येथे एका शासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आलेली जट्रोफाची झाडे आता गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळू लागली आहेत. या झाडांचा उन्हाळ्याच्या उत्तरार्धात गावकऱ्यांना कमालीचा त्रास होत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.१०-१२ वर्षापूर्वी नागभीड येथील रेल्वेच्या जागेत जट्रोफाची फार मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. औषधीयुक्त आणि पेट्रोलजन्य वनस्पती म्हणून त्यावेळी या वनस्पतीचा मोठा गवगवाही झाला होता. नागभीडच्या रेल्वे जागेत या वनस्पतीची लागवड सुरु असताना सहज गंमत म्हणून भिकेश्वर येथील काही व्यक्तींनी १०-२० रोपटे उचलून नेले आणि एका शासकीय इमारतीच्या आवारात लावले. आता ही झाडे चांगली डेरेदार झाली आहेत. एवढेच नव्हे तर आता फुलायला, फळायला लागली आहेत.ही झाडे जानेवारी महिन्यात फुलोऱ्यावर येत असून फेब्रुवारी महिन्यात फळाला येतात. आता मार्च महिन्यात ही फळे परिपक्व होत असून मे या महिन्यात ती फुटायला सुरुवात होते. जट्रोफाची ही फळे फूटायला सुरुवात झाली की, या फळामधून पांढऱ्या रंगाचा कापसारखा तंतु बाहेर पडतो. एका फळातून हजारोंच्या संख्येत हे तंतु बाहेर पडतात आणि हवेच्या झोतावर वातावरणात तरंगत असतात. हवेचे झोत बंद झाले की हेच तंतु नागरिकांच्या नाकातोंडात जात असतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. खाजगी जागेत असती तर गावकऱ्यांनी ही झाडे तोडली असती पण ही झाडे शासकीय इमारतीच्या आवारात आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची पंचाईत तर झाली आहेच; पण त्याचबरोबर मे या महिन्यात जट्रोफाच्या तंतूनी गावकऱ्यांवर बेजार होण्याची वेळ येत असते.
जट्रोफाची झाडे उठली नागरिकांच्या जीवावर
By admin | Published: March 30, 2016 1:27 AM