कारवाईची मागणी : वनविभागाच्या जागेवर विहिरीचे बांधकामगुंजेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे सन २००७-२००८ अंतर्गत जवाहर विहीर मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पण त्या विहीर मंजुरीसाठी बनावट दस्ताऐवजाचा आधार घेण्यात आला. वनविभागाच्या जागेवर जवाहर योजनेच्या शासकीय विहिरीचे बांधकाम करुन शासनाची व प्रशासनाची फसवणूक केल्याने संबंधीत व्यक्ती व महसूल विभागाच्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी वरिष्ठ स्तरावर दिलेल्या तक्रार अर्जात विलास कवडू गुरनुले यांनी केली आहे.सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही तलाठी साजा क्रमांक १९ अंतर्गत येत असलेल्या गुंजेवाही मा. नं. २ गट क्रमांक ८७ भोगवट वर्ग १ मध्ये ०.४८ हेक्टर आर जागा असून ती जागा लताबाई शिवशंकर कामतवार यांच्या नावे आहे. ती जमीन कोरडवाहू असल्याने त्यांनी त्या जागेवर जवाहर योजनेची शासकीय विहिर बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरुन अर्ज सादर केला. पण त्या जवाहर योजनेच्या विहिर बांधकामासाठी लागणारे कागदपत्रे यामध्ये त्यांनी सातबारा, अपत्याचा दाखला व जातीचा दाखला असे संपूर्ण दस्तावेज सादर करावयाचे असताना त्यांनी सातबारा ०.४८ हे.आर. नुसार ही योजना मिळणार नाही या कारणाने संबंधित महसूल विभागाचे तलाठी यांच्या सोबत संगनमत करुन ०.४८ आर जागेऐवजी तलाठ्याकडून ०.६८ हे आर जागा करुन सातबारा तयार केला. तसेच ०.६८ हेआर जागेचे प्रमाणपत्रसुद्धा घेतले आहे. एखाद्याच्या नावाने कोणत्याही योजनेची केस तयार करताना सातबाऱ्यावर ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यांचाच जातीचा दाखला अनिर्वाय आहे. परंतु जवाहर योजनेची विहिर मंजुर करताना त्यांनी बनावट सातबारा, बनावट तलाठ्याचे प्रमाणपत्र, बनावट जातीच्या दाखला व अपत्याच्या दाखल्याचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर सरपंच गुंजेवाही यांची कुठेच सही व शिक्का नाही. तसेच १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामासुद्धा लिहून दिलेला आहे. हा करारनामा जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी (जि.प. सिंचाई) उपविभाग सिंदेवाही यांना सादर केला. तेव्हा त्या करारनाम्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजा गुंजेवाही ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथे सर्व्हे नं. ८७ भोगवट वर्ग एक आराजी ०.६८ हेआर शेतामध्ये सन २००९ ते २०१० या वर्षाकरिता शासनातर्फे जवाहर विहीर मंजुर करण्यात आल्याने त्या विहिरीचे अंदाजपत्रकीय किंमत १ लाख रुपये आहे असे नमूद केले आहे. परंतु संबंधित व्यक्तीने शासनाचे नियम धाब्यावर बसवून संपूर्ण विहिर बांधकामाला लागणाऱ्या केसेस (अर्ज) मध्ये बनावट कागदपत्राचा वापर करुन ग्रामपंचायत गुंजेवाही, कृषी विभाग पंचायत समिती सिंदेवाही व सिंचाई विभाग पंचायत समिती सिंदेवाही यांची दिशाभूल करुन बनावट सातबाराच्या आधारे जवाहर योजनेची विहिरी मंजुर करुन घेतली. पण त्या विहिरीचे बांधकाम वनविभागाच्या गट नं. ८८ मध्ये करुन अटी शर्तीचेही उल्लंघन केले आहे.तसेच करारनाम्याच्या सत्यापत्रामध्ये बांधकामासंदर्भात खोटी माहिती आढळल्यास भादंविस कलम १९९, २०० व ९३ /२ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे लिहून दिले आहे. तसेच साक्षदार म्हणून सुद्धा करारनाम्यावर सही घेतली आहे. हा करारनामा दिनांक २० मे २०१० ला घेण्यात आला. या प्रकरणाच्या दस्ताऐवजाची सखोल चौकशी करुन या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी व उपवनसंरक्षक अधिकारी ब्रह्मपुरी यांना १९ मार्च २०१५ ला तक्रार अर्ज केला.त्यानुसार संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्या विहिरीची रक्कम शासन जमा करुन संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी विलास कवडू गुरनले यांनी केली आहे. (वार्ताहर)
बनावट सातबाऱ्यावर घेतली जवाहर योजनेची विहीर
By admin | Published: December 09, 2015 1:24 AM