चंद्रपूर : त्रिशरण एनलाईटन्मेंट फाउंडेशन पुणे व ऊर्जा फाउंडेशनतर्फे महिलांना भरोशाचा, सुरक्षेचा व आपुलकीचा हात झलकारी सिक्युरिटी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूर येथे लवकरच प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन ऊर्जा फाउंडेशनच्या अध्यक्ष मेघा रामगुंडे यांनी मनपा आयुक्तांना बुधवारी दिले आहे.
प्रत्येक हाऊसिंग सोसायटी, सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालये, खासगी कंपन्या येथे पुरुष सुरक्षा रक्षकच दिसून येतात. तेथे कामासाठी गेलेल्या महिलांची अनेकदा गैरसोय होताना दिसून येते. येथे महिला सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केल्यास हा प्रकार टाळता येणार; तसेच अनेक महिलांना व युवतींना रोजगार मिळेल, तसेच अनुचित प्रकार घडण्याचे प्रमाण टाळण्यास सोईचे होईल. ही संकल्पना घेऊन त्रिशरण फाउंडेशन पुणे व ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘झलकारी’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. याद्वारे महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमाबाबत ऊर्जा फाउंडेशनच्या अध्यक्ष मेघा रामगुंडे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.