चौथा दिवस : मनरेगाअंतर्गत कामे देण्याची मागणीगोंडपिपरी : गोंडपिपरी शहरातील जॉबकार्डधारक मजुरांना मनरेगाअंतर्गत कामे व भत्ता द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ६ मार्चपासून जॉबकार्डधारक मजुरांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. काल शुक्रवारी गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी शासनाच्या निर्णयानुसार कामे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपोषणकर्त्या मजुरांना दिले. मात्र मजुरांनी दोन वर्षापासून आश्वासनापलिकडे काहीच केले नाही, असे म्हणत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार मजुरांनी केला आहे.गोंडपिपरी शहरातील जाबकार्डधारक मजूर मागील दोन वर्षापासून मनरेगा अंतर्गत काम मिळविण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करीत होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी ३०० मजूर कामापासून वंचित होते. सदर मजुरांना दुसरे कोणतेही व्यवसाय नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्यामुळे मजुरांनी आपल्या मागण्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे रेटून धरल्या. वरील दोन्ही मंत्र्यांनी जाबकार्डधारक मजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत; मात्र वर्ष लोटूनही दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना दाद दिली नाही. मंत्र्यांच्या आदेशाला जेव्हा प्रशासकीय अधिकारी हुलकावणी देतात तर आमच्या समस्या खरच सोडविणार का, असा प्रश्न मजुरांकडून उपस्थित केला जात आहे. मजुरांवर प्रशासनाकडून अन्याय होत असून दोन वर्षापासून हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबियांवर अपासमारीचे संकट कोसळत असल्याने हे आंदोलन सुरू केल्याचे आंदोलनकर्त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. १५ मजुरांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जॉबकार्डधारक मजुरांचे आमरण उपोषण सुरु
By admin | Published: April 10, 2017 12:45 AM