लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्रांतर्गत सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, सिनाळा येथील सरपंच गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे, जि.प. सदस्य रोशनी खान, पं. स. सदस्य संजय यादव, सुभाष गौरकार, विलास टेंभूर्णे, गंगाधर वैद्य, संतोष नरूले, राजू रत्नपारखी, किसान आघाडीचे राजू घरोटे, माजी पं. स. सदस्य लोकचंद कापगते, क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग, दुगापूरचे उपक्षेत्रीय अधिकारी प्रसाद, पोलीस पाटील नरूले आदी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना यापूर्वी ३८ कोटी रूपयांचे वितरण करण्यात आले. २४७ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण हे कर्तव्य समजून वेकोलितील प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाचा सतत पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकºयांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला. आता काहींना नोकरीही मिळणार आहे. यासाठी कोल इंडिया, वेकोलि प्रबंधनाला जमिनीचा मोबदला व प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीकरिता बाध्य केले. वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्राअंतर्गत सिनाळा येथील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना ५२ कोटी रूपये वितरण होणार आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी अस्वस्थता होती. ती आता दूर झाली. ही आनंदाची बाब आहे.२६९ हे. आर. जमिनीचा पूर्वी देण्यात आलेला मोबदला केवळ दोन कोटींचा होता. त्यामध्ये आता २६ पट वाढ होवून ५२ कोटी झाली आहे. वेकोलि प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. वेकोलिने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून शक्य तेवढे सहकार्य करीत नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे. प्रकल्पप्रभावीत सर्व गावांना सर्व मूलभूत सोयी-सुविधांनी आदर्श करण्याची गरज आहे, असेही ना. अहीर यांनी सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी ४.५० कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या नाना बानकर तसेच १ कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या आत्राम कुटुंबीयांचा ना. अहीर यांनी सत्कार केला. सामाजिक जाणीवा कायम ठेवून कार्य केल्यास नागरिकांच्या समस्या सुटू शकतात, असा आशावाद मंचावरील मान्यवरांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ना. अहीर व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, वेकोलिचे अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारइयत्ता १० व १२ वीच्या परीक्षेत सिनाळा येथील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये रोहित दुर्योधन, अंजली वैद्य, साक्षी रामटेके, श्रुती रायपुरे, संजीवनी रायपुरे, प्रज्ज्वल रायपुरे, पायल मडावी, करिश्मा, रोहीनी रामटेके, ऋतिक मांडवकर आदींचा समावेश होता. सरकारच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेवून पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य घडवावे, असे मत ना. अहीर यांनी व्यक्त केले.
सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:58 PM
वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्रांतर्गत सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ठळक मुद्देआनंदाचे वातावरण : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा पाठपुरावा