चंद्रपूर : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकरीवर असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ५७ शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.
राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमच्या तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली आहे. असे असले तरी काही खासगी शिक्षक संस्थानी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. दरम्यान, या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदतही दिली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये या शिक्षकांनी टीईटी पास केली नाही. परिणामी नुकत्याच लागलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा सर्वांवर आता गडांतर येणार आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यात डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र यातील अनेकांना नोकरी लागली नाही. दुसरीकडे टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेले पगार घेत आहेत. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर शिक्षक पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे बेरोजगार असलेले टीईटी उत्तीर्ण विद्यार्थीही आपल्यावरील अन्यायासाठी प्रशासकीय स्तरावर दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
एकूण शिक्षक- १४,००५
अनुदानित शाळांतील शिक्षक-४,४७४
कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक-३,१३२
बाॅक्स
टीईटी पास नसलेले शिक्षक (माध्यमिक) ५७
कोट
टीईटी उत्तीर्ण संदर्भात शासनस्तरावर जे आदेश येतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार की नाही याबाबत आत्ताच बोलणे उचित ठरणार नाही.
-उल्लास नरड
शिक्षणाधिकारी, माध्यमिक
कोट
जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नसेल. तर त्यांना आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांच्या मुलाबाळांसह कुटुंबाचा प्रश्न उभा होण्याची शक्यता आहे.
-प्राचार्य नरेंद्र बोबडे
अध्यक्ष,जिल्हा मुख्याध्यापक असो.चंद्रपूर
कोट
टीईटी पास नसलेल्या शिक्षकांना मुदतवाढ दिली पाहिजे. या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. शासनाने त्यांना मान्यता सुद्धा दिली आहे. पगार दिला जातो. त्यामुळे आता कारवाई करणे हे अत्यंत चुकीचे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर नियुक्ती झाली तर त्यांच्यावर कारवाई करावी.
-सुधाकर अडबाले
सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ