: शेतकऱ्यांचा मात्र विरोध,
सास्ती : राजुरा शहराला लागून असलेल्या जोगापूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर, त्या परिसरातील घनदाट जंगल आणि वाढलेले वाघ व अन्य प्राणी संख्या पाहता आता हे वनक्षेत्र ताडोबाप्रमाणे पर्यटनस्थळ करून जंगल सफारी योजना वन विभाग सुरू करणार आहे. त्यादृष्टीने येथील अंतर्गत मार्ग, तलावाचे साैंदर्य वाढविणे, याबाबत चाचपणी केली जात आहे.
ही वनभ्रमण करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची वार्ता आहे. परंतु या वनक्षेत्रात वन सफारीच्या नावाखाली वाहनांची वर्दळ वाढून वन्यप्राणी मात्र सैरावैरा होऊन लगतच्या शेती पिकाची नासाडी होणार आहे. तसेच हे वन्यप्राणी गावाशेजारी येऊन परत मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढणार आहे.केवळ वन्यप्राणी दर्शनाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असला तरी शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्नासोबतच वन्यप्राण्यांच्या जीविताशी खेळ सुरू होणार आहे. त्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांनी या जंगल सफरीला तीव्र विरोध केला आहे. वन्य जीवाचे सुरक्षिततेबाबतचा प्रश्न समोर करून वन्यप्राणी संघटनेच्या आक्षेपानंतर तालुक्यातील मूर्ती येथील विमानतळ रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना परत मर्यादित असलेल्या जोगापूर वनक्षेत्रात जंगल सफारीमुळे वन्यप्राण्यांना कोणते संरक्षण देणार आहे, असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे.
तसेच या वनक्षेत्रातून मध्य रेल्वेचे बलारपूर ते हैदराबाद, चेन्नई हा रेल्वे मार्गसुद्धा आहे. येथे जंगल सफारी झाल्यास वाहनांच्या वर्दळीने भयभीत होऊन वन्यप्राणी या रेल्वे मार्गाने गेल्यास अपघात होऊन वन्यजीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी वन्यजीव प्रेमी संघटनेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या जंगल सफारीला काही युवक मंडळींकडून स्वागत होत असले तरी यामुळे होणाऱ्या वन्यप्राणी-मानव संघर्ष व शेतपिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी वर्गांनी तीव्र विरोध केला आहे.