बल्लारपुरात कलागौरव कार्यक्रम : महाराष्ट्र पत्रकार संघाचे आयोजनबल्लारपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात आजची वाटचाल वेगळ्या दिशेने चालेली आहे. या भूमिकेवर चिंतन करण्याची गरज आहे. सजग व अभ्यासू वृत्ती जोपासणे महत्त्वाचे आहे. समाजात बदल घडविण्यासाठी ध्येय आडवे येत नाही. यासाठी पत्रकारांनी अविश्वासाचे वातावरण बदलण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज आहे, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर यांनी येथील कलागौरव समारंभात बुधवारी येथे दिला.येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक स्केटिंग मैदान, बालाजी वार्ड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय रंग भरण चित्र स्पर्धा पुरस्कार व कलागौरव कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष देवेंद्र आर्य तर उद्घाटक म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांची उपस्थिती होती. मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, वाहतूक व विपणन विभागाचे वनसंरक्षक सी.एम. बारणकर, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, संजय रामगीरवार, पद्माकर वांढरे यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांनी मागदर्शन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने राज्यस्तरीय रंग भरण चित्र स्पर्धेचे पुरस्कार, सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार सुनिल कुहीकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर पांढरे व लोकसेवेत कार्यरत कोरपना तालुक्यातील बिबी गावचे गिरीधर काळे यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. विजय सोरते यांनी तर आभार अनेकश्वर मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रशांत विघ्नेश्वर, अजय रासेकर, प्रशांत वैरागडे, सुरेश रामगुंडे, रमेश निषाद, विकास राजुरकर, प्रशांत रणदिवे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
पत्रकारांनी अविश्वासाचे वातावरण बदलण्याची गरज
By admin | Published: January 10, 2016 1:10 AM