पुरस्कार वितरण समारंभ : पत्रकार दिन समारंभात आवाहनचंद्रपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात चंद्रपूरचे नाव मोठे आहे. या जिल्ह्याचे पत्रकारितेमध्ये मोठे योगदान आहे. ही गौरवी परंपरा कायम ठेवण्यासाठी पत्रकारांनी आपल्या ध्येयाशी तडजोड करू नये, असे आवाहन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले.चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी पार पडलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या समारंभात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास होते. सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ पत्रकार के.के. मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य बंडू लडके, ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायण तिवारी, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, सरचिटणिस उमाकांत धोटे, कार्याध्यक्ष विनोदसिंग ठाकूर, चंद्रगुप्त रायपुरे, वैभव पलिकुंडावार आदी मंचावर होते.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना शांताराम पोटदुखे पुढे म्हणाले, या समारंभात आपण पाहुणा म्हणून नव्हे तर पत्रकारांचा एक घटक म्हणून आलो आहे. काही काळ १६ वर्षे आपण या पत्रकार संघाचे अध्यक्ष होतो, अशी आठवणही त्यांनी यावेळी काढली. ते म्हणाले, पत्रकारांनी कोणतीही बातमी एकांगी लिहिण्यापेक्षा दुसरी बाजू घ्यायला हवी. पत्रकारितेतील नवे तंत्र आत्मसात करायला हवे.कीर्तीवर्धन दीक्षीत म्हणाले, पत्रकारांनी स्वत:ला अधिक विकसित करावे, त्यासाठी आत्मचिंतन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. रवी गिते म्हणाले, माध्यमे वेगवान झाली असून सोशल मिडियाही प्रभावी ठरत आहे. आता साधने आणि स्पर्धा वाढली असल्याने सकस आणि शुद्ध पत्रकारितेची गरज आहे. मुरलीमनोहर व्यास यांचेही यावेळी अध्यक्षीय भाषण झाले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बालपणात घडलेल्या संस्कारांची आठवण भाषणातून काढली. ते म्हणाले, आयुष्यात संस्काराची शिदोरी महत्वाची असते. त्या बळावरच आपण मोठे झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. के.के. मेश्राम आणि भीमराव पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गोपाळराव रायपुरे यांचा सामाजिक प्रबोधनाचा रंगारंग कार्यक्रम झाला. समारंभाचे औचित्य साधून छायाचित्रकार देवानंद साखरकर आणि गोलू बाराहाते यांनी लावलेल्या छायाचित्र प्रदर्शनीचेही उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सरचिटणीस डॉ. उमाकांत धोटे यांनी केले. संंचालन कोषाध्यक्ष मोरेश्वर राखुंडे तर आभार नारायण महावादीवार यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)सेवाव्रती आणि पत्रकारांचा सन्मानया प्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना लोकमान्य टिळक सेवाव्रती पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्रह्मपुरीतील ज्येष्ठ पत्रकार के.के. मेश्राम यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने आणि जीवती येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोबतच, स्व. चंपतराव लडके स्मृती सेवाव्रती पुरस्कार सावलीचे पत्रकार गोपाळराव रायपुरे, स्व. रामवती जयराजसिंग ठाकूर स्मृती पुरस्कार वन्यजीव छायाचित्रकार देवानंद साखरकर, स्व. लिलाताई बांगडे स्मृती झेप गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी हेमंत गुहे यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि अकराशे रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या वृत्तलेखन स्पर्धात यशस्वी ठरलेल्या पत्रकारांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यात स्व. चांगुणाताई मुनगंटीवार स्मृती पर्यावरण पत्रकारिता पुरस्कार बल्लारपूर लोकमत समाचारचे पत्रकार मंगल जीवने, स्व. श्रीनिवास तिवारी शोधवार्ता पुरस्कार माजरीचे विरेंद्र राय, स्व. समताताई नालमवार स्मृती विकास वार्ता पुरस्कार लेखक आशीष देव आणि शांताराम पोटदुखे पुरस्कृत शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कार सुशील नगराळे यांना देण्यात आला.
पत्रकारांनी ध्येयाशी तडजोड करू नये- पोटदुखे
By admin | Published: January 07, 2016 1:37 AM