चंद्रपूर : कंत्राटदाराने बांधकाम केलेल्या पुलाचे १ कोटी रुपयांचे बिल काढण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिवती येथील कनिष्ठ अभियंता चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) मंगळवारी रंगेहाथ अटक केली. अनिल जगन्नाथ शिंदे (२६) असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
यवतमाळ येथील मुंगसाजी कन्स्ट्रक्शन कंपनीने जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आरसीएलडब्लूई या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत पूल बांधण्याचे काम घेतले होते. कंत्राटदाराने पूल बांधकाम केल्यानंतर अंदाजे १ कोटी रुपयांची चार बिले जिवती कार्यालयात सादर केली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिवती येथील कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे यांनी दोन बिले आता व उर्वरित दोन बिले नंतर मंजूर करवून देण्याच्या कामाकरिता दोन लाख रुपयांची लाच मागितली.
कंत्राटदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे सापळा रचून शिंदे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, एएसआय रमेश दुपारे, नापोशि नरेशकुमार नन्नावरे, पो. शि. रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, मेघा मोहुर्ले, रमेश हाके आदींनी केली.