भद्रावती : चंद्रपूर वीज केंद्रातून आवळा- कचराळा गावात प्लॉयअॅश वाहून नेणारी लोखंडी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काही चोरट्यांनी चोरुन मेटॅडोरने वाहून नेत असताना पाईपसह चालकाला भद्रावती पोलिसांनी अटक केली. ही कारवाई कचराळा भागात सोमवारच्या रात्री केली.गेल्या कित्येक दिवसांपासून चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा घोटाळा गाजत असताना याच परिसरातील कचराळा नाल्यातून रेतीची तस्करी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. रेती चोरीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असले तरी पोलिसांनी मात्र यावर अंकुश लावला. रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी एम.एच. २६ बी ४२२२, ४०७ क्रमांकाचा मेटॅडोर अडविला. यात वीज केंद्रातील फ्लॅय अॅश वाहून नेणारे ६० मिटर लांबीचे लोखंडी पाईप आढळून आले. या पाईपची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे. पोलिसांनी पाईप ताब्यात घेऊन चालकाला अटक केली. यामध्ये पुन्हा सहा ते सात आरोपी असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॅय अॅश वाहून नेणारे लोखंडी पाईप चोरी गेल्याबाबत सेक्युर्टी प्रबंधक मजीतसिंह दयाशंकर सिंग यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही कारवाई एपीआय डब्ल्यू. एच. हेमणे यांनी केली. आरोपीवर ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
फ्लॅय अॅश वाहून नेणारे लोखंडी पाईप चोरणारा जेरबंद
By admin | Published: December 30, 2014 11:31 PM