लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर दारू विक्रेते तसेच मद्यपी दारू सुरु होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. आता मात्र ही वाट काही दिवसांवर आली असून लवकरच दारू दुकाने सुरु होणार आहे. परवाना नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु झाली आहे. दरम्यान, परिपूर्ण कागदपत्र असलेल्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जागेचा प्रथम मौका चौकशी करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधिक्षक दुकाने सुरु करण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच जिल्ह्यातील दारू दुकाने सुरु होणार आहे.दारूबंदी उठल्यानंतर दारू व्यावसायिकांनी परवाना नुतनीकरणासाठी कागदपत्र गोळा करणे सुरु केले आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने शेकडो परवानाधारकांच्या चुकाच अधिक काढल्यामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागले. दरम्यान शुक्रवारी पुन्हा परवाना नुतनीकरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे शेकडो अर्ज अले असून नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हा ५३६ दारूची दुकाने तसेच बार होते. यातील ४६ परवाने इतर जिल्हात स्थानांतरीत झाले. तर ४९० जिल्हात होते. त्यापैकी ३१४ बारचे स्थलांतरण झाले नाही. तर देशी दारूच्या किरकोळ १०६ दुकानांपैकी ८ परवाने तेव्हाच स्थलांतरीत झाले. विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या २४ दुकानांपैकी १९ दुकानांचे स्थानांतर झाले आहे. या दुकानांचा परवाना नुतनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, अनेकांनी शासकीय नियमानुसार चालान सुद्धा घेतले असून पुढील प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात २०१५ पर्यंत ज्या अनुज्ञप्त्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नुतनीकरण वैध करण्यात येणार आहे. दरम्यान, नुतनीकरण अर्जासोबत २०२१-२२ शासनाने ठरवून दिलेले शुल्क भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेसाठी प्रथम अनुज्ञप्ती देण्यात आली होती. त्याच जागेवर नव्याने परवाना नुतनीकरण होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या जागेवर दुकान सुरु करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची निराशा झाली आहे. काहींनी जुन्याच जागेची डागडुजी सुरु केली आहे.
गडचिरोलीतील व्यावसायिकांचेही लक्ष- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही व्यावसायिकांनी चंद्रपूर येथे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. - गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे तेथील व्यावसायिकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे, तेथील बंदीनंतर चंद्रपूरसारखीच गडचिरोलीचीही अवस्था असल्याचे बोलल्या जात आहे.- चंद्रपूर-गडचिरोली सीमाभागामध्ये अनेकांचे लक्ष असून या माध्यमातून पुढील आर्थिक चक्र फिरणार आहे.
गाठीभेटींना आला वेग
दारूबंदी उठल्यानंतर काहींनी नवीन परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. तर काहींनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी या व्यवसायात उतरण्याचे स्वप्न बघणे सुरु केले आहे. त्यासाठी जुन्या परवाना धारकांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होते की स्वप्नच राहते, ही येणारी वेळच सांगणार आहे. सध्यातरी दुकाने सुरु होण्याची अनेकांना प्रतीक्षा लागली आहे.