कोविड उपचाराचे बिल वसूल केल्यानंतर अहवाल सादर करावा लागतो. याकडेही दुर्लक्ष केल्याने शहरातील १३ खासगी कोविड रुग्णालयांना नोटीस बजावली; मात्र रुग्णालयांनी अद्याप अहवाल दिला नसल्याचे समजते.
कोरोना संसर्गाचा कहर सुरू असताना शहरातील १३ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली. या रुग्णांमध्ये शेकडो कोविड रुग्णांनी उपचार घेतला. त्यासाठी प्रशासनाने शुल्क निश्चित करून दिले होते; मात्र काही रुग्णालयांनी अतिरिक्त शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व खासगी कोविड रुग्णालयातील देयकांचे लेखापरीक्षण सुरू केले. यासाठी देयकांशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना मनपा आरोग्य विभागाने दिल्या होत्या; परंतु देयके सादर केली नाहीत, त्यामुळे मनपाचे आरोग्य विभागाने शहरातील १३ कोविड रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. अतिरिक्त बिल घेतल्याचे ऑडिटमध्ये स्पष्ट झाल्यानंतर किती रुग्णांना रक्कम परत करण्यात आली, याची माहिती मनपाने अद्याप जाहीर केली नाही.
चंद्रपुरातील १३ खासगी रुग्णालयांना नोटीस
डॉ. झाडे हॉस्पिटल, पोटदुखे हॉस्पिटल, श्वेता हॉस्पिटल, शिवजी, मेहरा हॉस्पिटल, गुलवाडे हॉस्पिटल, मेहरा हॉस्पिटल, क्राईस्ट हॉस्पिटल, बिंदावणी हॉस्पिटल, डॉ. टिपले, नगराळे हॉस्पिटल
कुबेर हॉस्पिटल, मुसळे हॉस्पिटल आदी १३ हॉस्पिटलला नोटिसा बजावण्यात आल्या. यातील काही रुग्णालयांनी मनपा आरोग्य विभागाकडे उपचाराची बिले सादर केली नाही.
अशी आहे आकडेवारी
१३
कोरोनावर उपचार केले जाणारे शहरातील रुग्णालये
०५
रुग्णालयनिहाय नियुक्त केलेले ऑडिटर्स
५६
बिल जास्त घेतल्याच्या तक्रारींची संख्या
रुग्णसंख्या ओसरल्याने प्रकरणे फाइलबंद?
कोरोना बाधितांची संख्या आता कमी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये शेकडो ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा रिकाम्या आहेत. बाधितांची संख्या कमालीची घटली. त्यामुळे चंद्रपुरातील सहा खासगी रुग्णालये कोविड सेंटर बंद करण्याच्या तयारीत आहेत. आता रुग्णसंख्याही ओसरू लागली आहे. त्यामुळे अतिरिक्त बिल वसुलीची प्रकरणे फाइलबंद होणार काय, असा सवाल रुग्णांचे कुटुंबीय विचारत आहेत.
भीतीमुळे अनेकांनी तक्रारीच केल्या नाहीत
खासगी रुग्णालयात भरती झालेल्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने शुल्क आकारून दिले होते. रुग्णालयांनी अधिकृत खर्च आधी नोंदविला. त्यानंतर वैद्यकीय उपचाराखालील अन्य खर्चही जोडले. त्यामुळे बिल वाढले. रुग्णांच्या कुटुंबीयांनी तक्रारी केल्या; परंतु हा खर्च तुम्हाला भरावाच लागेल, असा तगादा रुग्णालयांनी लावला. रुग्ण उपचार घेत असल्याने डॉक्टरांशी वाद कशाला, असे म्हणून अनेकांनी तक्रारीच केल्या नाहीत.