ग्रामस्थांचे प्रयत्न फळाला : गावकऱ्यांनी व्यक्त केला आनंद बाखर्डी : कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निमणी हे गाव अनेक समस्यांनी त्रस्त आहे. या गावात अद्याप एसटी महामंडळाची बसच पोहचली नव्हती. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राजुरा आगाराची बस सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात विधानसभा युवक काँग्रेस महासचिव उमेश राजूरकर व सरपंच गजानन भोंगळे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने राजुरा आगार व्यवस्थापक आर.एन. घोडमारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हा विभागीय वाहतूक अधिकारी वडस्कर यांनी पत्राद्वारे लवकरात लवकर ई-मेल करून बस सेवा सुरू करण्याबाबत राजुरा आगार व्यवस्थापक आर.एन. घोडमारे यांना कळविले. त्यांनी जराही विलंब न बाळगता गडचांदूर-निमणी बससेवा सुरू केली. बससेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुष्पमालांद्वारे बस सजवून सरपंच व उपसरपंच अनिल जगताप यांनी बसची पूृजा केली. यावेळी बस चालक एम.एस. राठोड, निलेश येवले व वाहक के.पी. भांगे, ईश्वर बुटचे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यावेळी रमेश भोंगळे, अनिल जगताप, प्रकाश टेंभुर्डे, निखील भोंगळे, शैलेष पतिक, चंदू राजुरकर, रंजीत गौरकार, निलेश महाकुलकर, भाऊजी टोंगे, विपुल टेभुर्डे व गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निमणीला पोहचली बस
By admin | Published: July 15, 2016 1:01 AM