सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जिद्द आणि शिक्षणाचा ध्यास असला तर त्याची परिणीती कशात होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील नंदोरी येथील नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ज्योत्स्ना बाळकृष्ण राजगडकर ही आहे.कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. वडील गिट्टी क्रेशरवर दगड फोडायला तर आई शेतात निंदण करायला जायची. स्वत:ची इंचभर जमीन नसल्याने उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. रहायला स्वत:चे घर नाही. गावातले सर्वात गरीब कुटुंब ही त्यांची ओळख. गेल्या २० वर्षांपासून भाड्याच्या ‘गोठ्यात’ राहत असलेले हे कुटुंब. आई-वडील जरी फारसे शिकले नसले तरी आपल्या मुलीने शिक्षणात उंच शिखर गाठावे, ही त्यांची मनोमन इच्छा व त्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी. आई-वडीलांच्या याच पाठबळाच्या आधारे व स्वत:च्या जिद्दीने ज्योत्सनाने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्रीकर निरीक्षक ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि चंद्रपूर येथे वस्तु व सेवाकर कार्यालयात विक्रीकर निरीक्षक (राज्यकर निरीक्षक) म्हणून रूजू झाली आहे. तालुक्यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारी ज्योत्स्ना ही मुलींमधून पहिलीच असल्याने तिने खºया अर्थाने आपल्या गावाचे नाव मोठे करीत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.ज्योत्स्नाचे १ ते ४ पर्यंतचे शिक्षण नंदोरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. ५ ते १० पर्यंतचे शिक्षण उमरी येथे वसतिगृहात राहुन घेतले. ११ वी, १२ वी वरूड येथे तर बी.ए. बी.एड. चे शिक्षण यवतमाळ येथे घेतले. त्यानंतर तिने उमरखेड येथे काही वर्षे एकात्मिक बालविकास सेवायोजनेतंर्गत पर्यवेक्षिका म्हणून नोकरी केली. नोकरीत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करीत तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली. तिची आई चंद्रकला, वडील बाळकृष्ण यांच्या सोबतच नंदोरी येथील नरेंद्र जिवतोडे तसेच यवतमाळच्या प्राध्यापकांचे तिला मार्गदर्शन लाभले.भावांनाही आणले शिक्षणाच्या प्रवाहातज्या मोठ्या भावाने ज्योत्स्नाच्या शिक्षणासाठी स्वत:चे शिक्षण सोडले होते. त्या भावाला ज्योत्स्नाने आज पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तोच पवन नावाचा भाऊ आज बी.ए. अंतिम वर्षात शिक्षण घेत असून लहान भाऊ नंदकिशोर हा इंजिनिअरींग करीत आहे. ज्योत्स्ना हिने दोन्ही भावांना शिक्षणासाठी एक प्रकारची प्रेरणा दिली. शिक्षणासाठी आई-वडिलांना घरातील वस्तु विकाव्या लागल्या, असे सांगताना ज्योत्स्ना भावूक झाली.स्पर्धात्मक परीक्षांसाठी शालेय शिक्षणाचा पाया मजबूत असायला हवा. १२ वी पर्यंतचे शालेय पाठ्यपुस्तके तर याची एक शिदोरीच आहे. सतत अभ्यास व इतरही वाचन यामुळेच मला ही परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य झाले. वाट काट्याची होती, पण ती फुलांची करण्यात मी यशस्वी झालो. यात माझे आईबाबा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. आता ‘क्लासवन’ अधिकारी बनण्याची इच्छा असून त्याची तयारी सुरू आहे.- ज्योत्स्ना राजगडकर, नंदोरी.
काटेरी वाटेतून ज्योत्स्ना झाली एमपीएससी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:20 AM
जिद्द आणि शिक्षणाचा ध्यास असला तर त्याची परिणीती कशात होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील नंदोरी येथील नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ...
ठळक मुद्देघरी अठराविश्व दारिद्र्य : मात्र जिद्दीमुळे परिस्थीतीवर मात