पोंभूर्णा : शासनाच्या दप्तरी कुठलीही नोंद नसलेला परंतु भरपूर जीवनसत्व असलेला ‘कचरकांदा’ शासकीयस्तरावर अद्यापही उपेक्षित आहे.कांदा म्हणजे कंद. कंद हा मुळापासून तयार होत असल्याने इतर फळांपेक्षा त्यात जास्त जीवनसत्त्व असते. त्यामुळे जंगलातील अनेक प्राणी मुख्यत: कंदावर जगतात. मानवी जीवनाची सुरुवातही पूर्वीपासून कंदावरच होती. त्यामुळे कांदा हा जीवनातील आहाराचा एक मुख्य भाग आहे. त्यात कांदे अनेक प्रकारचे असतात. अनेक औषधी गुणधर्म तसेच जीवनसत्त्व व खनिजामुळे कांदा पौष्टीक व गुणकारी असून ते चांगले अन्न म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे जगात सर्वत्र प्रचलित असलेल्या या कांद्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मराठीमध्ये प्रामुख्याने या कांद्याला कचरकांदा किंवा केसाळ कांदा असे म्हणतात. कांदा हे अॅलीक्सी कुळात मोडणारे व अॅलिअम वंशात जन्माला आलेले नैसर्गिक पीक आहे. कचरकांदा अनेक लोकांना माहित आहे. परंतु त्याच्या उत्पत्तीबाबत सर्वच लोक अनभिज्ञ आहेत. कचर कांद्यावर आजपर्यंत कोणतेही संशोधन करण्यात न आल्याने पुस्तकी भाषेत किंवा शासनाकडे याची कुठेही नोंद नाही. परंतु या कचरकांद्याला भरपूर मागणी आहे. आज लोकसंख्येच्या तुलनेने हा कांदा अपुरा पडत असल्याने या कांद्यावर संशोधण होणे गरजेचे आहे. भारतात हा कांदा सर्वत्र आढळत असून पौष्टीकतेबाबत व उपयुक्ततेबाबत लोकजागृती नसल्याने हा कांदा उपेक्षीत आहे. परंतु या कांद्याच्या भरवश्यावर महाराष्ट्रातील अनेक कुटुंब शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून करीत आहेत. या कांद्याला मानवी जीवनात महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी विभागाने याकडे विशेष लक्ष दिल्यास हा कांदा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा म्हणून उदयास येवू शकतो. ज्याप्रमाणे शिंगाडा या पिकाने शेती व्यवसायात आपले स्थान निर्माण केले, त्याचप्रमाणे कचर कांद्याची शासनाने दखल घेतल्यास शिंगाडा उत्पादनातून ज्याप्रमाणे लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली तिच संधी या व्यवसायात मिळू शकते.निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव वनस्पतीला विशिष्ट ओळख दिली आहे. परंतु कचरकांदा या पिकाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास व जनजागृती न झाल्याने ते दुर्लक्षीत पीक ठरले आहे. वास्तविक या कांद्याच्या उपयुक्ततेबाबत नव्याने कृषी क्षेत्रात जोडधंदा पीक म्हणून नोंदणी झाल्यास एकूण लोकसंख्येच्या काही प्रमाणात लोकांना हा कांदा रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. कृषी विभाग हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करीत असतो. दूरदर्शन, रेडीओ, वृत्तपत्र, नियमकालिके, मासिके, साप्ताहिके, कृषी संचालय, कृषी विद्यापीठे आदी प्रसार माध्यमातून कचरकांदा वगळता इतर पिकांबाबत पुरेशी माहिती पुरविली जाते. ेपरंतु आजही कचरकांदा या सर्व बाबींपासून दूर आहे. (तालुका प्रतिनिधी)भारत कृषी प्रधान देश आहे. भारतात कचरकांद्याची निर्मिती नैसर्गिकरित्या होत असल्याने संशोधनाने कचरकांद्याच्या लागवडीचे तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. तसेच शासनस्तरावर या कांद्यातील अन्नघटकाबाबत सखोल परीक्षण करून त्याच्या उपयोगितेबाबत जनजागृती करून कचरकांद्याला स्वत:चे अस्तित्व निर्माण करून देणे गरजेचे आहे. याबाबत संपूर्ण माहितीचे संकलन करून शासनस्तरावर मागील एक वर्षापूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- धम्मा के. निमगडेकचरकांदा संकलनकर्ता, पोंभूर्णा
शासकीयस्तरावर ‘कचरकांदा’ उपेक्षित
By admin | Published: September 22, 2015 1:37 AM