आशिष खाडे
पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रस्त्याला पथदिवे बसविण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गाव प्रकाशमय बनले होते. परंतु त्या पथदिव्यांचे बिल अजूनही न भरल्यामुळे त्रस्त बनलेल्या महावितरणने आता वीज कपातीची मोहीम हाती घेऊन, वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कळमना, भडकाम, मोहाळी या तिन्ही गावांचा वीज पुरवठा बंद केला आहे.
चालू वर्षातील अनेक महिन्यांचे बिल ग्रामपंचायतीकडे थकीत आहे. त्यासंदर्भात महावितरणने याबाबत ग्रामपंचायतीला सूचनादेखील दिल्या होत्या की, मुदतीच्या आत वीज बिल न भरल्यास ही वीज कनेक्शन्स खंडित करण्यात येतील. अशा पूर्वसूचना देण्यात आल्या. या बाबीकडे ग्रामपंचायतीने पाहिजे तसे लक्षही दिले नाही व त्याबाबत काही उपाययोजनादेखील आखली नाही.
तसेच अनेक ग्रामपंचायतींची स्थिती हलाकीची आहे. कारण अनेक ग्रामपंचायतींचा कर नागरिकांकडून वसूल झालेला नाही. आधीच ग्रामपंचायती तोट्यात असल्यामुळे हे पथदिव्यांचे वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्याचा फटका आता वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांना बसत आहे.
ऐन पावसाच्या दिवसात वीज खंडित करण्याचा सपाटा महावितरणने सुरू केल्यामुळे ते नागरिकांना धोक्याचे आहे. कारण या दिवसात साप, विंचू, तसेच अनेक धोकादायक किडे पावसात इतरत्र वावरत असतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या जिवाला एकप्रकारे धोका निर्माण झाला आहे.
कोट
ग्रामपंचायतीचे वीज बिल यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत भरले जात होते. परंतु आता ग्रामपंचायतीने ते बिल भरावे, असा अध्यादेश काढल्यामुळे डबघाईस आलेल्या ग्रामपंचायतींना ते भरणे शक्य नाही. त्यामुळे पूर्वीसारखेच ते बिल जिल्हा परिषदेमार्फत भरण्याची व्यवस्था करावी व महावितरणने वीज पुरवठा खंडित करणे थांबवावे. अन्यथा महावितरणच्या अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल.
- वैशाली राजू बुद्धलवार
जिल्हा परिषद सदस्या
कोट
नागरिकांकडे सहा लाख ७४ हजार ३२४ रुपये कर थकीत आहे. इतर कोणतेही स्रोत नाहीत, की ज्यामुळे ग्रामपंचायतीला पैसे मिळतील. पथदिव्यांचे बिल आठ दिवसांच्या मुदतीत भरू, अशी विनंती केली. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मुजोरशाही करीत कळमन्याचा विद्युत पुरवठा खंडित केला. तात्काळ वीज जोडणी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
- रूपेश पोडे
उपसरपंच, ग्रामपंचायत कळमना.