चंद्रपूर : मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्य होण्याबाबत शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झालेली आहे. कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्याची पुढील कार्यवाही होण्यापूर्वी कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावक-यांचे मत घेणे आवश्यक असल्याचे 14 वी राज्यस्तरीय वन्यजीव बैठकित ठरले आहे.
यासाठी प्रत्येक गावात विशेष सभा घेऊन गावकऱ्यांचे मत घेण्याचे सुरु आहे. कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्यांत एकूण 33 गावांचा समावेश असून ही गावे 18 ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये विशेष सभेचे आयोजन करुन सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन अध्यक्ष, ग्रामसेवक, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचे उपस्थित सभा घेण्यात येत आहे.
4 मार्च 2020 पासून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा बोलावून कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्य बाबत गावक-यांचे मत घेणे बाबतची कार्यवाही सुरु आहे. या सभेमध्ये सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) पी. जी. कोडापे, सहाय्यक व्यवस्थापक ( एफडीसीएम कोपीलवार, मेश्राम, व संबधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करीत आहे. उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग गजेंद्र हिरे व विभागीय व्यवस्थापक मध्य चांदा रेड्डी (एफडीसीएम) चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सभा घेण्याची कार्यवाही सुरु आहे.