प्रशासनाचे दुर्लक्ष : आरोग्यावर विपरित परिणामलोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : राज्यात गुटख्याबरोबर सुंगधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर परिसरात सुंगधित तंबाखू व बनावट तंबाखूची (माझा) सर्रास विक्री सुरु आहे. तंबाखूमिश्रित खर्ऱ्याचे व्यसन ग्रामीण भागातील युवकांना जडल्यामुळे तंबाखूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांचा फायदा होत सुगंधीत तंबाखू येथून दोन किमी अंतरावर असलेल्या करंजी येथील व्यावसायिक दुचाकीने व मिनीडोअरने अनके गावांत खुलेआम अवाढव्य किंमतीत तंबाखूविक्री करुन दररोज लाखोची उलाढाल करीत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.गोंडपिपरी शहरासह ग्रामीण भागात खर्रा खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महिलासह शाळकरी मुलांनासुद्धा खर्ऱ्याचे व्यसन जडले आहे. त्यामुळे गावा-गावात पानटपऱ्याच्या संख्येत वाढ झाली आहे. या बनावट जीवघेण्या तंबाखुमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यात सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घातली असली तरी व्यावसायिक सहजपणे बनावट तंबाखू विक्री करुन पानटपरी चालकाकडून अधिकचे पैसे घेतात. त्याद्वारे खर्रा खाणाऱ्या ग्राहकाशी जीवघेणा खेळ सुरु आहे. गोंडपिपरी तालुका हा तेलगणा सीमेवर वसला असून अगदी हाकेच्या अंतरावर हा परिसर येत असल्यामुळे सहजपणे सुगंधीत व बनावट तंबाखूचा पुरवठा होत आहे. डोळ्यादेखत पुरवठा करुन विक्री करतात परंतु आजपर्यंत यांच्यावर कुठलही कारवाई झाली नसल्याने त्यांचे मनोबल वाढतच चालले आहे. या अवैध तंबाखू विक्रीला प्रशासनाचे अभय असल्याचे बोलले जात आहे. सुगंधीत व बनावट तंबाखूची खुलेआम विक्री होत असतानासुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खर्रा खाणारे बेरोजगार शेतकरी शेतमजूर, लहान मुले, महिला यांच्या पैशाचा चुराडा होत आहे. बनावट तंबाखू विकणाऱ्या व्यावसायिकांचे मात्र चांगलेच फावत चालले आहे. या सुगंधीत तंबाखूच्या नावावर बनावट तंबाखू विक्री करून विक्रेते मालामाल होत आहे. तर खर्रा सेवन करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसून येत आहे.
करंजीमध्ये सुगंधित तंबाखूची विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:37 AM