करंजी एमआयडीसी सुरू करा, अन्य शेतजमिनी परत करा
आक्सापूर : १९८० च्या दशकात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील सुमारे ३५ एकर मोक्यावरची शेतजमीन औद्योगिक प्रयोजनार्थ शासनाने अधिग्रहित केली. तत्कालीन बाजारमूल्याने शेतकऱ्यांना मोबदलादेखील मिळाला. मात्र एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही करंजी एमआयडीसीच्या जागेवर एकही उद्योग उभा राहिला नाही. येथील जागा केवळ आबालवृद्धांच्या विरंगुळा आणि शतपावलीपुरती उरली आहे. यामुळे करंजी एमआयडीसीकडून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला काम द्या, अन्यथा शेतजमिनी परत करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल गोंडपिपरी तालुका उद्योगविरहित आहे. परिणामी सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारांच्या हाताला तालुक्यात कामे नाहीत. शेती आणि शेतमजुरी हा मुख्य व्यवसाय असलेल्या या तालुक्यात शेतीचा हंगाम आटोपला की येथील मंडळी रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकतात. अशावेळी मात्र लगतच्या तेलंगणा राज्याचा गोंडपिपरीकरांना मोठा आधार वाटतो. मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी तालुक्यातील मंडळी आपल्या बिऱ्हाडासह काही महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. अशा कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. गतवर्षी कोरोनामुळे पुकारलेल्या लाॅकडाऊननंतर जेव्हा मजुरांचा स्वगृही परतीचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या या कुटुंबीयांना घर गाठेपर्यत मोठ्या यातना सोसाव्या लागल्या. याचा प्रत्यय सर्वांना आला.
बॉक्स
उद्योग नाही, केवळ वृक्षलागवड
करंजी एमआयडीसीवर उद्योग उभारणीसाठी आजपर्यंत राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही पत्रव्यवहार केला. मात्र याचा काहीएक फायदा झाला नाही. या भूखंडावर भौतिक सुविधा आणि सामाजिक वनीकरणामार्फतीने वृक्षलागवड या पलीकडे तिसरे काम झाले नाही. असे असताना राजुरा विधानसभेची निवडणूक लढताना बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्याचा करंजी एमआयडीसी हा विषय ठरलेलाच. एकदा निवडणुका झाल्या की पाच वर्षासाठी हा विषय दुर्लक्षित पडतो. विशेष म्हणजे, तालुक्याला लागून वर्धा, वैनगंगा आणि अंधारीसारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुका आजही उद्योगाविना विकासापासून दूर आहे.
कोट
मोठे उद्योग उभे राहू शकत नसतील तर स्थानिक महिला बचत गट, सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगारांना येथील भूखंडाचे वाटप करावे.
- समीर निमगडे,
सदस्य ग्रा.पं.करंजी.
बॉक्स
पालकमंत्र्यांनीच आता आपल्या गावाकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार करंजी गावचे सुपुत्र आहेत. या गावाच्या मातीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार सरपंच तर भाऊ विलास वडेट्टीवार करंजी गावाचे उपसरपंच राहिले. करंजी गावाशी त्यांची नाळ आजही जुळली आहे. त्यांनीच आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
100721\img-20210708-wa0088.jpg
फोटो