वरोरा : येथील एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटर, मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर आणि भारतीय माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहीद योगेश डाहुले चौक वरोरा येथे प्रथमच कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सकाळी शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ३०० विद्यार्थी, विविध संघटना सहभागी होत्या. दरम्यान, एनसीसी कॅडेट मार्फत पथसंचलन करून हुतात्मा स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर होत्या. याप्रसंगी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, माजी सैनिक कॅप्टन निब्रळ, ज्येष्ठ समाजसेवक रमेश राजूरकर, नगरसेविका सुनिता काकडे, नगरसेवक छोटू शेख, माजी नगरसेवक विलास नेरकर, वरोराचे शहीद जवान योगेश डाहुले यांचे वडिल व मातोश्री यांची उपस्थिती होती. यावेळी कारगिल योद्धा म्हणून दहा माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबत कोविडमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० सामाजिक संघटना आणि डॉक्टर नगर परिषद अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागपूर व चंद्रपूर विभागातून ४० वर माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमसाठी एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटर व मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरचे माजी सैनिक सागर कोहले, प्रवीण चिमूरकर, रवी तुरणकर, रवी चरुरकर, जयंत मारोडकर आणि अनेक सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले. संचालन विनोद उमरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार माजी सैनिक खापने यांनी केले.
मिरवणूक व माजी सैनिकांच्या सत्काराने कारगिल विजय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:30 AM