चंद्रपूर : जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत असून, विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. सिंदीच्या पानापासून झाडू व्यवसाय करणारे हळूहळू या व्यवसायापासून काढता पाय घेत आहेत. हा व्यवसाय करणारे बहुतांश लोक आदिवासीबहुल भागात राहतात. अशा गावांमध्ये अशा बाजारपेठेचा अभाव असून, बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची सुविधा नाही. दुकानात मिळणाऱ्या आधुनिक झाडूने बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे बहुतांश गावातील हा व्यवसाय बंद झाला आहे. सिंदीच्या पानापासून झाडू बनविण्याचा व्यवसाय पिढ्यान्पिढ्या चालत आला आहे; मात्र सद्यस्थितीत झाडू बनविण्यासाठी सिंदीची झाडेच कमी झाल्यामुळे पाने मिळणे कठीण झाले आहे. हा व्यवसाय करणारे कुशल कारागीर हतबल झाले आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, हा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत आहे.या झाडूंना ग्रामीण भागात थोडीफार मागणी आहे. महाराष्ट्रात सिंदीच्या झाडांची संख्या अत्यल्प असल्याने ही पाने परराज्यातून आणावी लागतात. त्यासाठी वाहतूक खर्च येतो. उत्पादन खर्चातील वाढ, झाडूची कमी मागणी यामुळे हे व्यावसायिक हलाखीच्या स्थितीत जगत आहेत.आधुनिकतेमुळे अनेक देशी-विदेशी उद्योगामुळे पारंपरिक व्यवसाय नष्ट होत असून, यापैकीच एक झाडू व्यवसाय आहे. नवनवीन प्रकारचे झाडू आणि व्हॅक्युम क्लीनर आल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस मोडकळीस आला आहे. या व्यवसायाकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याने खेडोपाडी घराघरांतून आढळणारी आणि ‘लक्ष्मी’ म्हणून संबोधली जाणारी केरसुणी इतिहासजमा होते की का, असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागात आजही केरसुणीला मागणी असली तरी केरसुणी घरात आल्यानंतर त्याची हळदी-कुंकूने पूजा करण्याची परंपरा आहे.परंतु, आधुनिकीकरणाकडे वळत असताना पारंपरिक पद्धतीने बनविल्या जात असलेल्या झाडू व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आधुनिक केरसुणी व्हॅक्युम क्लीनर यासारखे साहित्य उपलब्ध झाल्याने व सिंदीची पाने हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे पारंपरिक झाडू व्यवसाय डबघाईस आला असून झाडू बनविणाऱ्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. (प्रतिनिधी)
आधुनिक झाडूमुळे केरसुणी हद्दपार
By admin | Published: January 04, 2015 11:09 PM