मागील काही दिवसांमध्ये चराई क्षेत्र घटले आहे. त्यातच पशुधनामुळे शेतकऱ्यांना पूर्णवेळ द्यावा लागत असल्याने दुसऱ्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी पशुंमध्ये, तसेच यंत्राच्या माध्यमातून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दुसरीकडे कत्तलीसाठी शेतकरी पशूंना विकत नाही. अशावेळी जवळ असलेल्या पशूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो. त्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील काही युवकांनी मिळून सद्गुरू जगन्नाथ बाबा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून मोकाट, कत्तलीसाठी नेणारे, तसेच शेतकऱ्यांनी दान केलेल्या जनावरांचे ते संगोपन करणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेणखत देणार असून, मिळणाऱ्या दुधातून जिल्ह्यातील कुपोषित बालकांना पौष्टिक आहार पुरविण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. या गौशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार, पिंपरीचे खेमराज पावडे महाराज हिरापूर येथील वामन पावडे महाराज यांनी गोमातेचे विधिवत पूजन केले.
कवडजईचे सरपंच शालिक पेंदाम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गराड, कृषी पर्यवेक्षक श्रीकांत ठवरे घनश्याम टाले, हरीश ढवस, मुरलीधर ढवस, विकास पिदुरकर, पानघाटे, नंदा देरकर, रामदास जेऊरकर, पुरुषोत्तम परकंडे, रवींद्र वासाडे, गौरव ठेंगणे, आदींची यावेळी उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बोबडे, सुरेखा परकंडे, दत्ताजी गावंडे, धनश्री बोबडे, आशा वासाडे, मनोहर बोबडे, शेषराव बोबडे यांनी यासाठी परिश्रम घेतले.